इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
इगतपुरी शहरात 24 तासात बिबट्याने दोनदा भरवस्तीत शिरकाव केल्याचे दिसून आले आहे. आधीच इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्यांची दहशत वाढत असताना त्याचे लोन शहर परीसरात आल्याने घबराट वाढते आहे. शुक्रवारी रात्री तळोघ गावात बिबट्याने दर्शन दिल्याचे समजते. नाशिकसह बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तज्ञ वन अधिकाऱ्यांना पाचारण करून इगतपुरी तालुक्यातील बिबट्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक ऐन दिवाळीत घाबरले असल्याने त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
इगतपुरीतील शिवाजी नगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याची घटना घडली असून पहाटे 5 वाजेच्या सुमारास मंगेश शिरोळे यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याचे वृत्त आहे. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास सुधाकर यादव हे आपल्या शेतातील गोठ्यात म्हशींचे दूध काढून दारात आले असता समोर दारात बिबट्या दिसताच त्यांची पाचावर धारण बसली. त्यांनी हिम्मत करून हातातील बादली बिबट्याच्या दिशेने भिरकावली व जोरात ओरडायला सुरवात केली. यामुळे बिबट्याने पळ काढल्यामुळे ते थोडक्यात बचावले. वन विभाग घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची पाहणी करत आहे. परिसरातील नागरिकांनी येथे तात्काळ पिंजरा व ट्रॅप कॅमेरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.