इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
घोटी बस स्थानकातील शौचालयाची दुरवस्था झाली आहे. तालुक्यातील अत्यंत वाईट असणारे शौचालय आणि स्वच्छतागृह घोटीच्या बसस्थानकात आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील प्रवास करणाऱ्या महिला व प्रवाशांना मोठा त्रास सोसावा लागतो. हे लक्षात घेऊन शौचालयाची तातडीने दुरुस्ती व नूतनीकरण करावे या मागणीसाठी आगार प्रमुख यांना भाजप युवा मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून घोटी शहरातील मुख्य ठिकाणी बसस्थानक असून जवळच शाळा, महाविद्यालये व दवाखाने आहेत. घोटी शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून शहरात कुठेही शौचालय नाहीत. त्यामुळे महिलांना केवळ बसस्थानकाच्या शौचालयाचा आधार घ्यावा लागतो. मात्र ह्या शौचालयाची अत्यंत खराब अवस्था झाली आहे. तालुक्याची मुख्य बाजारपेठ असल्याने घोटी बस स्थानकात मोठ्या प्रमाणत महिला नागरिकांची वर्दळ असते मात्र शौचालय नसल्याने महिलांना अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे भाजप युवा मोर्चाच्या वतीने आगार प्रमुख यांना निवेदन देऊन शौचालयाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर, इगतपुरी तालुकाध्यक्ष रवी गव्हाणे, संघटन सरचिटणीस भाऊसाहेब धोंगडे, राहुल मोहिते, प्रकाश तोकडे आदी उपस्थित होते.