इगतपुरीचे आराध्य दैवत : घाटनदेवी माता

निसर्गराजाने नेत्रात साठवता येणार नाही एवढी भरभरुन दिलेली वनराई…मंद मंद धुंद करणारा पाऊस…घनदाट वृक्षांची छाया…मुक्तहस्ते निर्मित धबधबे…खोल खोल दऱ्या…हंबरत हंबरत मंजुळपणे चरणारी गायी गुरे…किलबिलाट करणारे पक्ष्यांचे थवे…रानफुलांचा मंद मंद सुगंध…पर्यटकांसह भाविकांचे असे अनेकानेक अंगांनी नटुन थटुन स्वागत करणारा कसारा घाट.. धार्मिकता नसानसात भरलेला भक्तांचा समुदाय…देवीचा उदो उदो करणारे भोळे आदिवासी भक्त… अशाच अनेक कारणांनी भीमाशंकरच्या दिशेने जाणारी शक्तीस्वरूप असणारी देवी या निखळ सौंदर्याला भुलुन येथेच भक्तांसाठी स्थानापन्न झाली. इगतपुरी तालुक्याची ही ग्रामदेवता घाटनदेवी नावाने प्रसिद्ध आहे. मंदिराची रचना सामान्य असून त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा केली जाते. या देवीचे स्थान घाटातील डोंगरदऱ्यांमध्ये असल्याने देवीला घाटनदेवी, शैलपुत्री अशा नावांनी भक्त ओळखतात. इगतपुरी तालुक्यासह राज्यभरातील भाविकांच्या नवसाला घाटनदेवी तात्काळ पावत दिव्यत्वाची प्रचिती मिळते असा भाविकांचा समज आहे. मांगल्य ओतप्रोत भरलेल्या घाटनदेवीच्या दर्शनाने मनातील चांगले कार्य सिद्धीस जाते असे भाविक सांगतात. मुंबई कडून येतांना सर्वांचे नासिक जिल्ह्यात स्वागत करणारा कसारा घाट चढून आल्यावर अनेकांचे हात आपोआप जोडले जातात. जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या जागरूकतेचे प्रतिक घाटनदेवीच्या चरणी भाविक नतमस्तक होतात. कसारा घाटात प्रवेश करतांना घाटनदेवी मातेचे मनोभावे दर्शन घेतल्यास भाविक भक्तांचे रक्षण स्वतः देवी करते असा इथल्या भक्तांचा समज आहे. घाटनदेवी मातेची दोन मंदिरे इगतपुरीच्या घाटात आहेत. अतिशय अवघड असलेल्या कसारा घाटात चालकांसह प्रवासीही जीव मुठीत धरून प्रवास करतात. हा प्रवास निर्विघ्न पार पाडावा यासाठी चालकासह प्रवासीही मातेचे दर्शन घेत पुढील प्रवास करतात. नवरात्रोत्सवातील नऊही दिवस घाटनदेवी मातेचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतो. आधीच नयनमनोहर असलेल्या मंदिर परिसरात आनंदाचे उधाण येते. घाटनदेवीच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमून जाते. घाटनदेवी मातेवरील श्रद्धा,भक्ती भावाच्या त्रिवेणीसंगम भावनेने जिल्ह्यासह राज्यभरातील भाविक नवरात्रोत्सवात दर्शन घेत धन्य झाल्याची अनुभूती घेतात.नवस आणि दर्शन परंपरा वर्षभर सुरु असते. यात्रोत्सव काळात विविध विक्रेत्यांनी थाटलेली दुकाने, रानफुलांच्या माळा, करमणुकीची रंगत वाढून मोठी गर्दी झालेली असते. नवरात्रीच्या काळात या दोन्ही मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मंदिराचा संपूर्ण परिसर कल्पना करता येणार नाही अशा निसर्गसौन्दर्याने वर्षभर फुललेला असतो. मंदिराशेजारी वनविभागाने मोहुन टाकणारे निसर्ग माहिती केंद्र सुरु केलेले आहे. या केंद्रात जिज्ञासु लोकांसाठी मोठा खजिनाच उपलब्ध आहे. जवळच अनेक मोठी मोठी हॉटेल्स आणि पर्यटकांना राहण्याच्या सुविधा आहेत. म्हणून या भागात वर्षभर पर्यटन करणारे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. एकदा कोणी पर्यटक आला तर त्याला पुन्हा पुन्हा यायला प्रवृत्त करणारे इथले वातावरण म्हणजे प्रती महाबळेश्वरच म्हणावे लागेल.

मांगल्याचा ठेवा आणि दुर्बळ मनाला आत्मशक्ती मिळण्यासाठी घाटनदेवीची मनोभावे प्रार्थना केल्यास प्रसन्नता मिळते. महामार्गावरील वाटसरुंना सुरक्षित वाटचाल करण्यासाठी घेतलेले दर्शन फलद्रुप होते.भाविकांसह पर्यटकांना अनुभूति देणारी घाटनदेवी शक्तीस्थान आहे. – भारती केणे, भाविक देवळे

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!