पुण्यात्मा प्रभाकर सेवा मंडळ आणि प्रहार दिव्यांग संघटनेचा उपक्रम
इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
डोक्यावर हक्काचे छप्पर असावे हे प्रत्येक महिलेचे स्वप्न असते. ह्या स्वप्नासाठी आयुष्यभर जीवाचे रान केले जाते. अनेक अडचणींचा सामना करूनही हक्काचे घर होईल की नाही अशी भीती अनेकांना सतावत असते. अशा अवस्थेत मनातले स्वप्न मात्र स्वप्नच ठरून वाट्याला फक्त मृगजळ येते. घरातला कुटुंबप्रमुख जग सोडून गेल्यावर मुलाबाळांचे पोषण करता करता घर मात्र कधीच होत नाही. अशा भयंकर परिस्थितीत इगतपुरी तालुक्यातील शिदवाडी येथील ३ आदिवासी महिला निवाऱ्याशिवाय राहत होत्या. त्यांच्यासाठी प्रहार दिव्यांग संघटना सरसावली आणि तिन्ही नवदुर्गांना हक्काचे घरकुल आज मिळाले. पुण्यात्मा प्रभाकर सेवा मंडळ संचालित अनुसायात्मज मतिमंद निवासी विद्यालय, इंदिरा भारती कर्णबधिर निवासी विद्यालय, रुख्माबाई अपंग स्वयंसहाय्यता केंद्र इगतपुरी यांच्या सौजन्याने नवरात्री पर्वावर तिन्ही निराधार महिलांकडे घरकुल सोपवण्यात आले.
इगतपुरी तालुक्यातील शिदवाडी ह्या आदिवासी वाडीतील पार्वताबाई किसन ठाकरे, संगीता अमृता ठाकरे, संगीता मनोहर ठाकरे ह्या विधवा निराधार महिलांना हक्काचे घर नव्हते. याबाबत प्रहार दिव्यांग संघटनेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे पाटील, उपाध्यक्ष सपन परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना समजले. त्यांनी पुण्यात्मा प्रभाकर सेवा मंडळ पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून ३ विधवा महिलांना आज आपले हक्काचे घर सोपवले. पुण्यात्मा प्रभाकर सेवा मंडळाच्या हेमलता जाधव, शीतल मराठे, सिद्धार्थ भोईर, जितेंद्र सोनवणे, गणेश घोडेकर, अमोल पाटील आदींनी उपस्थित राहून महिलांना मोठा आधार दिला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर म्हणाले की, स्वतः दिव्यांग असूनही सामाजिक क्षेत्रात मौलिक योगदान देणाऱ्या प्रहार दिव्यांग संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. इगतपुरीनामाचे संपादक भास्कर सोनवणे म्हणाले की, धडधाकट आणि उत्तम आर्थिक स्थिती असूनही समाजाचे ऋण चुकवणाऱ्या तथाकथित लोकांनी दिव्यांगांचा आदर्श घ्यावा. यावेळी इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रामदास धांडे, अनिता रामदास घारे, युवा कार्यकर्ती शिवानी घारे, यश घारे, निवृत्ती कातोरे, पत्रकार जाकीर शेख, निवृत्ती शिद, खंबाळेच्या सरपंच द्वारका शिद, सदस्य उत्तम पारधी, मुकुंद वारघडे, कैलास शिद आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रहार दिव्यांग संघटनेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे पाटील, उपाध्यक्ष सपन परदेशी, पत्रकार मंगेश शिंदे, निलेश जाधव, अशोक ताथेड, भाऊसाहेब कोरडे आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी काळूस्तेच्या माजी सरपंच अनिता रामदास घारे, युवा कार्यकर्ती शिवानी घारे, यश घारे यांनी ३ निराधार महिलांना एका महिन्याचे किराणा साहित्य, उपयोगी कपडे वाटप केले. लवकरच अजूनही साहित्य वाटप करणार असल्याचे युवा कार्यकर्ती शिवानी घारे हिने सांगितले.