धक्कादायक : पुष्पक एक्सप्रेसमध्ये बलात्कार ! दोघांना अटक ! इगतपुरी कसारा स्थानकांदरम्यान घडला प्रकार

आरोपींमध्ये घोटीचे दोन तरुण असल्याची प्राथमिक माहिती

इगतपुरीनामा न्यूज दि. ०९ : लखनऊ मुंबई पुष्पक एक्सप्रेस मध्ये शुक्रवारी रात्री वीस वर्षांच्या तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यासंदर्भात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींनी ट्रेनमधील प्रवाशांची लूटही केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मध्य रेल्वेच्या इगतपुरी ते कसारा स्थानकाच्या दरम्यान पुष्पक एक्सप्रेसमध्ये हा संतापजनक प्रकार घडला असून दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपी घोटी येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून उर्वरित आरोपींचाही कसून शोध घेतला जात आहे . दरम्यान गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता यापुढे पोलिसांकडून काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

लखनऊ कडून मुंबई कडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस मध्ये शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास सदर प्रकार घडला आहे. गुन्ह्यांमध्ये जवळपास सात ते आठ आरोपी सामील असल्याचे प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत असून त्यापैकी काही जणांनी पंधरा वीस प्रवाशांची लूट केल्याचीही संतापजनक घटना समोर येत आहे. संतापजनक आणि गंभीर बाब म्हणजे यातल्या काही जणांनी ट्रेनमधील एका वीसवर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. दरम्यान कल्याण रेल्वे पोलिसांत यासंदर्भात गुन्हा दाखल झाला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून चौकशी सुरु आहे. उर्वरित काही आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

शुक्रवारी संध्याकाळी पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्थानकातून कसाराच्या दिशेने रवाना झाल्यानंतर कसारा घाटातील बोगद्यामध्ये ट्रेन स्लो झाल्यानंतर सात ते आठ जणांनी ट्रेनमध्ये प्रवेश केला. प्रवाशांना फायटर आणि बेल्टच्या साह्याने मारहाण करत प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावण्यास सुरुवात केली. त्याच वेळी एका वीस वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही प्रवाशांनी धाडसाने यातील काही जणांना पकडून ठेवले आणि कल्याण स्थानकावर पोहोचल्यानंतर त्यापैकी दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. चालू ट्रेनमध्येच काही आरोपी फरार झाले असून जीआरपी कल्याण आणि रेल्वे क्राईम ब्रांच या घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पुढे काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!