प्रभाकर आवारी, इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा मुकणेचे माजी सरपंच विष्णु पाटील राव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील व पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
सुरवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान व खंदे समर्थक म्हणुन काम पाहणारे विष्णु पाटील राव हे मुकणे गावचे माजी सरपंच तथा घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणुन कार्यरत होते. इगतपुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते काही वर्षे पदाधिकारी होते. राजकीय दृष्ट्या नावाजलेले व संवेदनशील असणाऱ्या मुकणे गावावर त्यांचा अनेक वर्षांपासुनचा एकछत्री अंमल व इगतपुरी तालुक्यात त्यांच्या कामाची वेगळी ओळख आहे. त्यांच्यावर जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असुन त्यांच्या निवडीने पक्ष संघटन वाढणार आहे. त्याबरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्वाची मानली जात असुन पक्षाने सोपवलेली जबाबदारी विष्णु पाटील राव हे यशस्वी पार पाडतील असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी सांगितले.
निवडीप्रसंगी माजी आमदार शिवराम झोले, जिल्हा परिषद गटनेते उदय जाधव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, गोरख बोडके, सुनील वाजे, उमेश खातळे, रतन जाधव, विष्णु चव्हाण, नामदेव वाकचौरे, अनिल पढेर, नारायण वळकंदे, सागर टोचे, मनीष भागडे, निलेश जगताप, वसीम सैय्यद, भाऊ पासलकर आदींसह इगतपुरी तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.