दगा झाला, घात झाला
सैतानी कोरोना भारतात आला
सगळीकडे एकच कोलाहल झाला
हा गेला तो गेला!!..
देशात मग लॉकडाऊन झाला
जनतेने त्याकडे कानाडोळा केला!
सर्दी, ताप, अन खोकला आला
संशयाने डोक्यात कहरच केला!!..
कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला
माणूस माणसासाठी परका झाला!
नात्यातील माणसाशी दुरावा आला
शेवटी कोरोना योध्यानेच अंत्यसंस्कार केला!!..
बघता बघता रोजगारही गेला
अन्न पाण्याविना जीव कासावीस झाला!
कोरोना आला कोरोना आला,
माणूस माणसासाठी परका झाला!!..
शाळा मंदिरानाही लावलाय तू टाळा
माय सांगे लेकरा घरातच रहा तू बाळा!
कोरोना आला कोरोना आला
माणूस माणसासाठी परका झाला!!..
माणसातील देवमाणसं जागी झाली
अन्न धान्याची वाटप केली!
तळीरामांची पंचाईत झाली,
सॅनिटायझर पिऊन पण नशा केली!!..
रेल्वे, लालपरी ही तुझ्या धाकानं गायब झाली
कासावीस जिवानी तान्हुल्या संगे पायपीट केली!
आता लढण्याची वेळ आली!
मास्क आणि सॅनिटायझरने आमची सुरक्षा केली!!.
आवाहन कराया जनतेला
कोरोना योद्धे रस्त्यावर आले!
माझे कुटुंब माझी जबाबदारी
शासनाचे सर्वेक्षण ही झाले!!..
निष्पाप बळी आता खूप झाले
अश्रू ढाळुनी डोळे झालेत ओले!
सैतानी रूपात तू माणसाला अतोनात छळले
संकट समयी डॉक्टर, नर्स, पोलिसांच्या रूपाने पांडुरंग कळले!!..
कोरोनाच्या वेदनेसह तू माणसांना दुखवलं
संयम, शिस्तीसह तू माणसं ओळखायला शिकवलं!
अंधाऱ्या रात्रीत आता प्रकाशाचे किरण दिसू दे
एका नव्या उमेदीने आता माणसांना जग भासू दे!!..
असह्य झाल्या वेदना आणि छळ तुझा
अश्रू दुःख संकट सोबत घेऊन जा!!..
एक नवी आशा, एक उमेद देऊन जा!!!
– कवी प्रकाश कवठेकर, ग्रामसेवक कोरपगाव
( कवी इगतपुरी पंचायत समिती अंतर्गत कोरपगाव येथे ग्रामसेवक पदावर कार्यरत आहेत. )