मास्कप्रपंच : मास्कचा सहाव्या शतकापासून ते आजपर्यंतचा इतिहास जाणून घ्या

लेखन : डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

एक काळ होता जेव्हा फक्त जैन मुनी, मुस्लिम स्त्रिया,
चोर, पाॅपस्टार्स आणि पुण्यातल्या मुली चेहरा झाकत पण आता ज्यानं चेहरा झाकला नाही त्याला दंड होतो अशी परिस्थिती आहे. ‘चेहरा झाकणं’ हे आताशा न्यू नाॅर्मल झालंय.. मास्कचा वापर सर्वसामान्य असला तरी हा काही नवीन प्रकार नाही.. ब्लॅक प्लेग पासून प्रदुषणापर्यंत आणि गॅस चेंबरपासून धार्मिक विधींपर्यंत मानवी इतिहासात मास्कचा कित्येकदा वापर झालाय.. स्वत:ची ओळख लपवण्यापासून ते स्वत:ला संक्रमणापासून वाचवण्यापर्यंत जवळपास इ. स. पूर्व सहाव्या शतकापासून ते आजतागायत हा मास्क वापरला जातोय. बरोब्बर ओळखलत..आज या मास्कचीच गोष्ट सांगतो..

मार्को पोलोच्या नोंदीनुसार तेराव्या शतकात चीन मध्ये नोकरमंडळींना मास्क वापरणं अनिवार्य होतं कारण काय तर सम्राटाच्या खाण्याचा सुवासही त्यांना येऊ नये..अठराव्या शतकात जसं जसं औद्योगिकीकरण वाढू लागलं तसं कारखाने धूर ओकू लागले आणि नागरिकीकरण जसं वाढलं तसा चुलींचा धूरही वाढला. शहरात सकाळच्या वेळेत हवेत काजळी साठू लागली आणि १९५२ च्या डिसेंबर महिन्यापर्यंत फक्त इंग्लंडमध्ये या काळ्या हवेनं चार हजार लोकांचा बळी घेतला..एका अंदाजानुसार नंतरच्या आठवड्यात अजून आठ हजार लोकांचे प्राण गेले तर १९५७ च्या डिसेंबर पर्यंत एकट्या लंडनमध्येच हजाराहून अधिक लोकांच्या जीवावर बेतली आणि यानंतर चार वर्षांनी १९६२ साली जवळपास साडेसातशे मृत्यू झाले..काही मोठ्या शहरात प्रदुषणाची पातळी एवढी वाढली की वाहतूकीसही त्याचा अडथळा होऊ लागला.. आजूबाजूच्या परिसरातील प्राण्यांचा श्वासावरोधानं मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या..

१९३० साली युरोपात टोपीचा ट्रेंड आला तसं काही लोकं मास्कही वापरू लागले..१९५६ आणि १९६८ कारखान्यांच्या धूर ओकणाऱ्या चिमण्यांवर नियंत्रण म्हणून ‘शुद्ध हवा’ नावाचा कायदाही बनवला गेला..या कायद्यान्वये चिमण्यांची उंची आणि नागरी वस्ती पासून तिचे अंतर याबाबत नियमन आखले गेले..

चौदाव्या शतकात ब्लॅक प्लेग या आजारानं पाऊल ठेवलं. १३४७ ते १३५१ या वर्षात या आजारानं अडिचशेहून अधिक लोकांचा बळी घेतला होता जो तत्कालिन लोकसंख्येच्या अनुपातात बराच मोठा आकडा होता..याच काळात डाॅक्टर मंडळींसाठी खास मेडिकल मास्कचा वापर सुरू झाला..या दरम्यान प्रदुषित हवेमुळं काही सामान्य जागरूक नागरिकही बाहेर पडतांना चेहरा मफलर-स्कार्फ-रुमाल यांचा वापर करत झाकू लागले.

सतराव्या शतकात प्लेगच्या साथीत काही मंडळी चिमणीच्या चोचेच्या आकाराचे मास्क वापरत..यांची छायाचित्र जेव्हा झळकली तेव्हा ती ‘मृत्यूची सावली’ या नावानं ओळखली गेली. या साथीत दुर्गंध येऊ नये म्हणून मास्क सुगंधी वनस्पतींमध्ये ठेवले जायचे. १६६५मध्ये आलेल्या प्लेगच्या महामारीत उपचार करणारे डाॅक्टर चामड्याचे मास्क-ग्लोव्हज-टोपी आणि चष्मा वापरत..
तो त्याकाळचा पीपीई किटच होता म्हणा ना..

एकोणिसाव्या शतकात मध्यपुर्वेत एका बाजूला टोळी युद्धांमुळं आणि उन्हामुळं स्त्रिया स्वत:ला बुरख्यात झाकू लागल्या तर युरोपात शिक्षित महिला सुर्यप्रकाश-धुळ-प्रदूषण यापासून संरक्षण म्हणून कपड्यांवरती जाळीदार वस्त्र वापरू लागल्या..
लंडन ट्रांसपोर्ट एजन्सी आणि किंग्ज कॉलेज लंडन यांच्या एका अभ्यासानुसार,”वायुप्रदुषणाचं मुळ हे वाढती वाहतूक आहे..पेट्रोल-डिझेल या इंधनांवर चालणारी वाहनं हवेत  नाइट्रोजन ऑक्साइड,बारीक रबरांचे कण आणि प्रदुषित धुर सोडत हवा दुषित करतात.” दुसऱ्या जागतिक महायुद्धकाळात आणि तद्पश्चात वीस वर्षात केमिकल वेपन्स क्लोरिन आणि मस्टर्ड गॅसचा वापर झाला..

शासनानं सैनिक आणि सामान्य नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं. १९३८ साली अगदी रस्त्यांवर ‘रेस्पिरेटर’ मास्क घालणारे लोकं दिसू लागले.. याच वर्षी युरोपात साडेतीनशे लाख रेस्पिरेटर वाटले होते. अगदी पोलीस अधिकाऱ्यांपासून कॅब्रे नृत्यांगणांपर्यंत सगळे ‘रेस्पिरेटर’ नावाचा मास्क वापरत..

या दरम्यान लोकांनी अगदी आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांनाही मास्क शिवले होते. चेसिंग्टन प्राणी संग्रहालयात तर खास माप घेऊन अगदी उंटांपासून घोड्यापर्यंत सगळ्यांसाठी मास्क बनवले गेले होते. महायुद्ध संपलं आणि स्पेनमध्ये फ्लूची साथ आली आणि हळूहळू या साथीनं आपले हातपाय पसरले..
सुरूवात स्पेनमधून झाली म्हणून ‘स्पॅनिश फ्लू’ या नावानं ओळखला गेलेल्या या आजारानं पाच करोड लोकांचा बळी घेतला. असं म्हटलं जातं की फ्रान्सच्या उत्तर प्रांतातून आलेल्या सैनिकांमुळं या विषाणुंचा फैलाव वाढला त्यामुळं तिकडून येणाऱ्या बस-ट्रेनवर औषधी फवारा मारला जाऊ लागला. सैनिकांचे जथ्थे जसे सीमेवरून शहरांकडे वळू लागले तसं हे संक्रमण गाव-शहर-खेडी सगळीकडं पसरू लागलं..

लंडन सारख्या शहरात जनरल ओम्निबस कॉर्पोरेशन सारख्या कंपन्यांनी औषधी फवारे आणि कर्मचारी वर्गासाठी मास्कची उपाययोजना केली. १९१८ साली प्रकाशित झालेल्या ‘नर्सिंग टाईम्स’ या वृत्तपत्रात या साथीच्या आजाराबद्दल तपशीलवार माहिती छापून आली ज्यात संक्रमणाला आळा घालण्यासाठी नॉर्थ केन्सिंग्टनच्या सेंट मॅर्लबोन इन्फर्नरी हॉस्पिटलमधल्या नर्सेसनी दोन पेशंटदरम्यान भिंत-वैद्यकिय कर्मचारी वर्गासाठी बैठकीची वेगळी व्यवस्था आणि फुल बाॅडी सूट अश्या प्रकारची व्यवस्था केल्याचं लिहिलं होतं..

याच बातमीत छापून आलेल्या मास्क घातलेल्या नर्सेसचे छायाचित्र बघून सामान्य लोकंही दैनंदिन व्यवहारात मास्क वापरू लागले आणि संक्रमणास मोठ्या प्रमाणात आळा बसला. १९८५ साल उजाडेपर्यंत मास्कमध्ये अनेक प्रयोग होत हा वेशभुषेचा एक भाग झाला आणि फॅशन जगतानंही याची दखल घेतली अनेक पाॅपस्टार मंडळी वेगवेगळे डिझायनर मास्क वापरू लागले. मग आलं विसावं शतक..प्रदूषण एवढं वाढलं की जाळीदार मास्क विलुप्त झाले आणि विशेषत: महिलावर्गात चेहरा झाकण्यासाठी स्कार्फ-स्टोल-बंदाना लोकप्रिय ठरले..

गेल्या वर्षी आला कोविड..
आता मास्क कथा-फॅशन नाही तर रिॲलिटी झाला..
कापडी मास्क-सर्जिकल मास्क-डबल लेयर्स-फिल्टर्ड मास्क-पी १००-फेस शिल्ड-एन् ९५ आणि काय नाही ?? भारतात तर वेगळी अर्थव्यवस्था उभी राहिलीय.. करोडो रुपये निव्वळ दंड गोळा झालाय मास्कपायी. ‘भारत आणि मास्क’ हे एक वेगळं पुराण होईल. ‘रेस्पिरेटर’ मास्कचे जनक आणि वैद्यकिय संशोधक फाॅरेस्ट बर्ड यांच्या जन्मदिनी सहज हा मास्कप्रपंच..!