वीज मंडळाकडून शेतकऱ्यांची वीज तोडल्यामुळे शेतकऱ्यावर टँकरने पिकांना पाणी देण्याची वेळ : भाजयुमोतर्फे राज्य शासनाचा निषेध

तोडलेली वीज तात्काळ जोडण्याची भाजयुमोची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २

कृषी पंपाचे वीजबिल थकल्यामुळे गरीब शेतकऱ्यांच्या पिकांवर कुऱ्हाड कोसळली आहे. वीज मंडळाने थकीत रक्कम भरण्यासाठी कुठलीही संधी न देता अनेक शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडले आहे. यामुळे प्रमुख पीक भात आणि बागायती पिकांना पाणी देता नाही. परिणामी हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. इगतपुरी तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. उभे टोमॅटो पीक वाचवण्यासाठी ह्या शेतकऱ्याने टँकरद्वारे पिकाला पाणी देणे सुरू केले आहे. इगतपुरी तालुका भाजपा युवा मोर्चाने वीज मंडळ आणि महाविकास आघाडी सरकारच्या तीव्र शब्दांत निषेध केला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याऐवजी डोळ्यात मिरच्या घालण्याचे काम सरकारकडून होत आहे असे मत भाजपा युवा मोर्चा इगतपुरी तालुका उपाध्यक्ष सागर रामभाऊ नाठे यांनी व्यक्त केले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या व महावितरणच्या मनमानी कारभारामुळे आज शेतकऱ्यावर टँकरने शेतीला पाणी देण्याची वेळ आली आहे. गेल्या 15 दिवसापासून गरीब शेतकऱ्यांची वीज कापण्यात आली आहे. त्याचा फटका कुऱ्हेगाव येथील शेतकरी संदीप धोंगडे यांना चांगलाच बसला आहे. पीक वाचवण्यासाठी शेतातील टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्यात येत आहे. महावितरण सोबत वारंवार संपर्क करून देखील याबाबत कुठल्याही प्रकारची संवेदना दाखवण्यात आली नाही असे संदीप धोंगडे यांनी सांगितले.

शेतकऱ्याच्या व्यथा समजून लवकरात लवकर वीज जोडण्यात यावी अशी मागणी इगतपुरी तालुका भाजपा युवा मोर्चाने केली आहे. याप्रसंगी शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेण्यासाठी गोंदे दुमालाचे माजी सरपंच गणपत जाधव, लोकनियुक्त सरपंच शरद सोनवणे, माजी उपसरपंच परशराम नाठे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम जाधव, भरत नाठे, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, भाजपा युवा मोर्चा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर, भाजपा युवा मोर्चा इगतपुरी तालुकाध्यक्ष रवी गव्हाणे, भाजपा युवा मोर्चा इगतपुरी तालुका उपाध्यक्ष सागर रामभाऊ नाठे आदींनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन दिलासा दिला.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!