– भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा
इगतपुरी त्र्यंबकेश्वर ह्या अतिदारिद्र्याच्या छायेतील अतिदुर्गम भागातील सामान्य नागरिकांसाठी संवेदनशीलतेने कार्याचा वस्तुपाठ उभे करणारे अधिकारी म्हणून तत्कालीन तहसीलदार महेंद्र पवार यांचा उल्लेख करावा लागेल. जीवन मरणाच्या शेतीच्या आणि जमिनीच्या वादांनी वर्षानुवर्षे होरपळणाऱ्या गोरगरिबांना महसुली कायद्यांद्वारे न्याय देणारे प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून महेंद्र पवार दोन्ही तालुक्यात सुप्रसिद्ध आहेत. शासनाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत जलद पोहोचवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. शिंदखेडा तालुक्यातील आदर्श शिक्षक स्व. रमेशराव पवार यांच्या आदर्श विचारांनी गोरगरिबांसाठी झपाटून काम करतांना महेंद्र पवार यांनी मातीतल्या माणसांना सामाजिक आणि नैसर्गिक न्याय देण्याचे महत्वपूर्ण काम केलेले आहे. महसुली न्यायव्यवस्था आणि शेतकरी ह्या समीकरणात खऱ्या अर्थाने सत्याची कास धरून शेतकऱ्यांचा ते जिवलग मित्र ठरले. जमिनीच्या क्षेत्रात महसुली काम करतांना विशिष्ठ लॉबी आपल्या बाजूने काम व्हावे म्हणून मोठी आमिषे दाखवत असते. अशा मोहाच्या गर्तेत न पडता फाटक्या माणसाचे म्हणणे आणि पुरावा याधारे त्यांनी दिलेले निकालपत्र राज्यातील अनेक तालुक्यात संदर्भ म्हणून टाकले जाते हे विशेष…
इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर ह्या दोन्ही तालुक्यात तहसीलदार म्हणून काम करतांना उपजिल्हाधिकारी पदावर त्यांची बढती झाली. अल्पकाळातच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून ते काम पाहायला लागले. ना. भुजबळ यांचे जबाबदारीने काम करताना महेंद्र पवार भुजबळ साहेबांचे विश्वसनीय झाले. महेंद्र पवार हे इगतपुरीला असतांना त्यांचा धडपड्या, संवेदनशील आणि सामाजिक दृष्टिकोन असणाऱ्या स्वभावाची प्रचिती आली. अल्पावधीतच त्यांनी ज्या पद्धतीने काम केले ते पाहून महेंद्र पवार ह्या अधिकाऱ्याचे पाणी काही वेगळेच असल्याचे जाणवले. अधिकाऱ्याला कोणते प्रश्न महत्वाचे वाटतात ह्यावर त्या अधिकाऱ्यांच्या सामाजिक जाणिवेची परीक्षा होते. आणि ह्या प्रश्नांना सामोरे जाऊन ते सोडवण्यासाठी काहीही करायची हिंमत फक्त महेंद्र पवार हेच दाखवू शकतात.
अनेक वर्ष रखडलेले जमिनीचे भावाभावांमधील जमिनीचे वाटप, सातबारा वरील लेखन प्रमादामुळे त्रस्त झालेले लोक, रस्ते आणि हद्दीचे वाद आदींवर महेंद्र पवार यांनी अतिशय जलदगतीने न्यायनिवाडे दिल्याने महत्वाचे प्रश्न सुटू शकले. यासह विविध नुकसानभरपाई, संजय गांधी योजना, विभक्त शिधापत्रिका, दिव्यांग आणि विधवा परित्यक्ता भगिनींना न्याय देण्यासाठी त्यांनी अग्रेसर काम उभे केले. यासह पुढे जाऊ इच्छिणाऱ्या अनेक ज्ञानपिपासू विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि आवश्यक साहाय्य त्यांनी केले. शासनाचा लालफितीचा भोंगळ कारभार आणि संवेदनाहीन कार्यपद्धतीमुळे शासकीय अधिकाऱ्यांपासून सामान्य नागरिक दूर पळतोय. अशा भयानक परीस्थितीत इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जनतेच्या हृदयात आपल्या शाश्वत कामांनी अढळ स्थान निर्माण करणारे आदरणीय महेंद्र पवार हे एकमेवाद्वितीय अधिकारी आहेत. आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्ताने त्यांना उदंड आयुष्यासाठी कोटी कोटी शुभेच्छा…!