अखेर कोषागार कार्यालयाकडून सेवानिवृत्तांच्या प्रश्नांची दखल : नाशिक जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या प्रयत्नांना यश

दसरा दिवाळीपूर्वी मिळणार फरकाची रक्कम

सुभाष कंकरेज, इगतपुरीनामा न्यूज, दि. २९

नाशिक जिल्ह्यातील शासकीय सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचे निवृत्तीवेतन, सुधारित निवृत्तीवेतन व अंशराशीकरण हे प्रस्ताव मुंबईच्या महालेखापाल कार्यालयाकडून अंदाजे ४-५ महिन्यांपासून मंजूर होवून आले आहेत. ह्या संबंधित सर्व प्रकरणांची फरक रक्कम व सुधारित निवृत्तीवेतन दसरा दिवाळी पुर्वी संबंधित सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात यावे असे आदेश जिल्हा कोषागार अधिकारी यांनी काढले आहेत. नाशिक जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकच्या जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांना याबतचे निवेदन ई-मेलद्वारे दिले होते. याबाबतचे वृत्त “इगतपुरीनामा” पोर्टलवर प्रकाशित करण्यात आले होते. याचीच दखल घेऊन जिल्हा कोषागार अधिकारी यांनी सत्वर कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी कर्मचारी यांना दिल्या आहेत. नाशिक जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनने जिल्हा कोषागार अधिकारी आणि “इगतपुरीनामा”चे आभार मानले आहेत.

दसरा आणि दिवाळी सणापूर्वी सेवनिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हक्काच्या फरकाची रक्कम प्राप्त होणार असल्याने आनंद व्यक्त करण्यात आला आहे. नाशिक जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष उत्तम बाबा गांगुर्डे, उपाध्यक्ष रवींद्र थेटे, सरचिटणीस मधुकर कांगणे, प्रसिद्धी प्रमुख सुभाष कंकरेज आदींनी पत्रकाद्वारे जिल्हा कोषागार अधिकारी आणि “इगतपुरीनामा”चे आभार मानले आहेत.

"इगतपुरीनामा" न्यूज पोर्टलने ह्या प्रकरणी वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा कोषागार अधिकारी यांनी याबाबत अधिक माहिती घेतली. हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी तातडीने याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले. संघटनेचे अध्यक्ष उत्तमबाबा गांगुर्डे यांना याबाबत अवगत करण्यात आले. संघटनेच्या पाठपुराव्याला "इगतपुरीनामा"ने नेहमीच बळ दिले असल्याचे त्यांनी कळवले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!