इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
नाशिक जिल्ह्यातील रांजणगिरी किल्ल्याच्या समोर आणि घारगड किल्ल्याच्या बाजूला एक सुळका आहे. हा सुळका डांग्या सुळका नावाने प्रसिद्ध आहे. या सुळक्याची उंची ३०० फूट असून अत्यंत कठीण चढाई आहे. याचा माथा गाठण्यासाठी गिर्यारोहकांना दोराच्या साहाय्याने चढावे लागते. 90 अंशाच्या डिग्री मध्ये असलेला हा सुळका शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती परिवाराच्या 14 सदस्यांनी सर केला. ह्या अभूतपूर्व चढाईत सहा वर्षाचा अनुराग पुरुषोत्तम रहाडे यानेही सुळका सर केला. अत्यंत निसर्गरम्य वातावरणात ही चढाई यशस्वी झाली. पुणे येथील सह्याद्रीपुत्र ट्रॅक्टर्स या संस्थेचे सोमनाथ शिंदे, अक्षय कोडक यांनी नेतृत्व केले. या ऐतिहासिक मोहिमेमध्ये शाम गव्हाणे, बाळासाहेब शिंदे, पूजा शिंदे, लखन पाळदे, गणेश कातोरे, किसन थोरात, अनिल दाते, गिरीश मोरे आदी मावळ्यांनी सुळका सर केला.
शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती परिवाराचे शाम गव्हाणे यांनी अनुभवाबाबत सांगितले की, डांग्या सुळक्याच्या माथ्यावरुन दिसणारे निसर्गाचे मनमोहक रूप आम्ही आमच्या डोळ्यात सामावून घेत होतो. त्याच बरोबर माथ्यावरुन दिसणारे निसर्गाचे अद्भूत चमत्कार म्हणजे नवरा नवरीचा सुळका. अंजनेरी किल्ल्याची मागची बाजू रांजणगिरी किल्ला घारगड किल्ला मुळेगाव वालदेवी धरण अजून खूप काही आम्हाला जेवढे आमच्या डोळ्यात साठवता येईल तितके साठवत होतो. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळीकडे हिरवळ रान पाहून खूप प्रसन्न वाटत होतं. सुळक्यावर उभे राहण्यासाठी जागा लहान असल्यामुळे आम्ही लवकर फोटो काढून उतरण्याची तयारी करू लागलो. एकेक करून सगळे सुखरूप खाली आलो. यात आम्हाला सह्याद्रीपुत्र ट्रॅक्टर्स पुणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.