मार्गदर्शक : डॉ. कल्पना श्रीधर नागरे
संपर्क क्र. 9011720400
चिकित्सा आणि बाल मानसशास्त्रज्ञ
( एम. ए. बी. एड, एम. फील. सेट, पीएचडी )
लेख वाचल्यावर ज्यांना शंका विचारायच्या आहेत अथवा ज्यांना आपल्या समस्या आणि प्रश्न आहेत असे पुरुष अथवा घरातील व्यक्तींनी व्यक्तिगत संपर्क साधल्यास त्यांना परिणामकारक मार्गदर्शन करण्यात येईल. आपल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी डॉ. कल्पना नागरे यांच्या 9011720400 ह्या क्रमांकावर अवश्य संपर्क साधावा.
पुरातन काळी मनुष्य हा शिकार करून आपली उपजीविका करत असे, हळू हळू तो कळपाने राहू लागला आणि त्यातूनच कुटुंब पद्धती उदयास आली. नकळतच स्त्री पुरुष यांच्या कामाचीही विभागणी होत गेली. पुरुष वर्ग कुटुंबाचे पालनपोषनाची जबाबदारी घेत तर स्त्रिया मुख्यतः घर आणि मुले यांचे संगोपन करत. ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. अर्थात आजच्या काळात स्त्रिया देखील घर, मुले सांभाळून कुटुंबाला आर्थिक सहाय्य करत आहे हा भाग निराळा ! परंतु आजही बऱ्याच घरांमध्ये पुरुष अर्थार्जनाचे काम करत आहे. पुरुषावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आजही दिसून येते. अशा एकट्या कर्त्या पुरुषांवर अधिक ताण दिसून येतो.
25 मार्च 2020 लॉकडाऊन देशात लागू झाला. त्यानंतर तो सतत वाढत गेला. नुकतीच कोरोनाची दुसरी लाट आली आहे. आणि भविष्यात तिसरी लाट ही येण्याची शक्यता आहे. या दृष्टिकोनातून देशात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन सुरू आहे. त्याचा विपरीत परिणाम समाजातील सर्व घटकांवर दिसून येत आहे. ‘वर्क फ्रॉम होम आता जगण्याचाच एक भाग झालेला आहे. परंतु यामुळे अनेक जणांना WFH हा स्ट्रेस म्हणजेच ‘वर्क फ्रॉम होम ‘नावाचा नवीनच मानसिक त्रास सुरू झाला आहे. यामध्ये अस्वस्थता, नैराश्य, चिडचिडेपणा, बैचेनी आणि याशिवाय झोपेच्या तक्रारी आदी समस्या दिसून येतात.
तासन तास काम करूनही बऱ्याच रुग्णांना झोप येत नाही. याचे प्रमाण पुरुष वर्गामध्ये अधिक दिसून येत आहे. विशेषत: घरातील एकट्या कर्त्या पुरुषांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. WHO जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार’ वर्क फ्रॉम होम’ काम करणाऱ्या नोकरदार व्यक्तींमध्ये लॉकडाऊन काळात डिप्रेशन, बायपोलर ( भाव स्थिती ) डीसोर्डर, चिंता विकृती आणि विचार अनिवार्यता विकृतींचे प्रमाण सर्वाधिक आढळून आले आहे. ह्या विकृतींचा परिणाम म्हणजे रात्री झोप न येणे. याशिवाय सतत लॅपटॉप, कॉम्प्युटर स्क्रीन समोर बसून पाठदुखी, डोकेदुखी, स्नायू दुखी यासारख्या शारीरिक समस्या देखील होत आहे. आहार ( डायट ) आणि व्यायामाचे दैनंदिन वेळापत्रक बिघडल्याने वजन वाढले आहे. ज्याचा परिणाम बऱ्याच व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास देखील होत आहे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक असते. असे संशोधनातून दिसून आलेले आहे. त्यामुळे भविष्यकाळात हार्ट अटॅक येण्याचा देखील धोका देखील वाढला आहे.
लॉकडाऊन काळात अनेक कंपन्यांनी वेतन कपात, कर्मचारी कपात केल्यामुळे आर्थिक नियोजनाची ही समस्या पुरुषांना सतावत आहे. विशेषत: एकट्या अर्थार्जन करणाऱ्या पुरुषांना याचा अधिक त्रास होत आहे. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे. बेरोजगार आणि गेल्या वर्षभरापासून व्यवसाय बंद असणाऱ्या पुरुष वर्गामध्ये आपल्या कुटुंबाचे पालन पोषण कसे करायचे या चिंतेमुळे नैराश्य आले आहे. त्यातून बऱ्याच पुरुषांमध्ये कमीपणाची भावना घर करून बसली आहे. त्यांच्या वर्तनातून नैराश्य, अति चिडचिडेपणा आक्रमकता, अति धूम्रपान, न्यूनगंड, एकाकीपणा अशा वर्तन समस्या प्रामुख्याने दिसून येत आहे. याची परिणीती म्हणजे दिवसंदिवस वाढणाऱ्या आत्महत्या, कौटुंबिक हिंसाचार मारहाण यामध्ये झाली आहे. आतापर्यंत अशा अनेक केसेस बघावयास आल्या आहे की, घरातील कर्त्या पुरुषाने नैराश्यातून स्वतःसह कुटुंबालाही संपवलेले आहे.
गेल्या वर्षभरापासून विचार करता एकट्या महाराष्ट्रात १७ हजार ९७२ लोकांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची आकडेवारीच सांगते. यात कर्जबाजारीपणामुळे नैराश्यग्रस्त शेतकरी, बेरोजगार युवक, सुशिक्षित तरुण, नोकरदार पुरुष मंडळी आदींचा समावेश होतो. अर्थात ही आकडेवारी कमी जास्तही असू शकते. वरील आकडेवारी ही केवळ पुरुष वर्गांची आहे. यावरून पुरुषांमध्ये नैराश्याचे प्रमाण किती आहे हे लक्षात येते.
तुम्हालाही जाणवत आहे का मानसिक ताण ? मग करा आत्मपरीक्षण…!
१. भावनिक अडथळे जसे राग येणे, नैराश्य आणि/ किंवा भिती वाटणे
२. पोटाचे विकार ज्यात आम्ल वाढणे, बद्धकोष्ठता होणे, आतड्यांतील जळजळीचे विकार, हृदयातील जळजळ आणि वायूचे विकार होणे समाविष्ट आहेत.
३. स्नायूंच्या समस्या जसे पाठदुखी, डोकेदुखी, आणि जबड्यांतील वेदना होणे.
४. स्नायूंतील ताणांमूळे स्नायू किंवा अस्थिबंधातील समस्या
उत्तेजीत होण्याची लक्षणे ज्यात चक्कर येणे, खुप घाम येणे, हातपायांचे गारठणे, श्वसनातील समस्या, रक्तदाब वाढणे, डोकेदुखी आणि हाताला तळहाताला घाम येणे, समाविष्ट आहेत.
५. आक्रमकता, अधीरता, साधारणतः शत्रुत्वाची भावना, आणि अंतरंगातील भिती. सगळ्याची न संपणारी भिती, नकारात्मकता आणि अविश्वासाचे भाव. उच्च रक्तदाब, छातीचे दुखणे, मायग्रेन अणि हृदयाच्या समस्या. सतत आपले मूल्यांकन होत असल्याची भावना येणे. हिंसक आणि आत्महत्येची वृत्ती, तणावांना खुप वेळ सहन केल्याने मानसिकरित्या गंभीरपणे कोलमडणे.
कशी कराल ताणावर मात ?
1.अति धूम्रपान, मद्यपान टाळा. या सवयी तुमच्या शारीरिक व मानसिक आरोग्यास घातक आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा.
2. कुटुंबातील वाद-विवाद टाळण्यासाठी शांत राहा. कोणतीही समस्या सामोपचाराने सोडवा, आरडाओरडा न करता आपले म्हणणे शांततेने मांडा.
3. जुने मित्र मैत्रिणी यांच्याशी फावल्या वेळात गप्पा व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे अथवा फोनवर गप्पा मारा. जेणेकरून एकटेपणा वाटणार नाही.
4. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भाव विवेचन करा. बऱ्याच पुरुषांची हीच समस्या असते की ते मोकळेपणाने बोलत नाही. त्यामुळे सतत तणावग्रस्त असतात. आपल्या भावना आपलं आपला जोडीदार अथवा घरातील व्यक्तींशी मनमोकळेपणाने बोला. जेणेकरून तुमचा ताण कमी होण्यास मदत होईल.
5. स्त्रियांनी सध्याची परिस्थिती बघता आपल्या नवऱ्याकडे अनावश्यक मागणी करणे टाळावे. बऱ्याच स्त्रियांचा सणावारामध्ये आपल्या नवऱ्याकडून महागड्या भेट वस्तूंची अपेक्षा असते. सद्यस्थिती बघता अशी अपेक्षा करणे टाळा. जेणेकरून कर्त्या पुरुषांवर त्याचा आर्थिक ताण येणार नाही.
लक्षात ठेवा कोरोनाचे संकट आज ना उद्या जाणारच आहे. परंतु अशा संकटात आपण आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणे गरजेची आहे. म्हणूनच आलेल्या संकटाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करा. घरातील कर्त्या व्यक्तीचे वर्तन, विचार हे सर्व कुटुंबाला प्रभावित करीत असतात. विशेषतः लहान मुलांना ! म्हणून घरातील वातावरण आनंदी प्रसन्न आणि हसत खेळत ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमची सकारात्मक ऊर्जा ही संपूर्ण कुटुंबाला सकारात्मक ऊर्जा प्रदान करीत असते. शेवटी “आपले कुटुंब आपली जबाबदारी !
( लेखिका डॉ. कल्पना श्रीधर नागरे ह्या चिकित्सा आणि बाल मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांची सेट नेट मानसशास्त्र, मनोविकृती मानसशास्त्र, उपयोजित मानसशास्त्र, वैकासिक मानसशास्त्र आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत. )