इगतपुरीनामा न्यूज, दि. ८
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या इगतपुरी तालुक्यातील भाम धरण प्रकल्पातील धरणग्रस्तांना हेक्टरी ९ लाख रुपयांचा मोबदला देण्यात आला होता. दुसरीकडे बांधण्यात येणाऱ्या समृद्धी महामार्गातील प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी ७ लाख ५० हजार रुपयांचा मोबदला दिला गेला. त्यामुळे भाम प्रकल्पग्रस्तांमध्ये मोबदल्याच्या बाबतीत भेदभाव झाल्याने संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी थेट आमदार हिरामण खोसकर यांच्याकडे आपली व्यथा मांडली. ह्या पार्श्वभूमीवर आमदार हिरामण खोसकर यांनी मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला द्यावा अशी मागणी केली आहे. याबाबत मंत्री पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. दरेवाडी येथील घरांचेही पेमेंट बाकी असल्याचे बैठकीत चर्चिले गेले.
यावेळी आमदार हिरामण खोसकर म्हणाले की, धरणासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असतांना शेतकऱ्यांना तुटपुंजा मोबदला दिला आहे. त्यामुळे भाम धरणात संपादित झालेल्या जमिनींच्या मालकांना वाढीव मोबदला द्यावा अशी मागणी त्यांनी केली. भाम धरणातील पाणी मराठवाड्यासाठी कायम राखीव ठेवण्याचे आदेश असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या उरल्यासुरल्या जमिनींसह इतर शेतकऱ्यांमध्ये संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. आमदार हिरामण खोसकर यांनी शेतकऱ्यांची भूमिका सरकारकडे मांडल्याने लवकरच भाम प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळणार आहे.
एकीकडे समृद्धी महामार्गासाठी ८० लाखांचा हेक्टरी मोबदला दिला गेला तर दुसरीकडे या भाम प्रकल्पग्रस्तांना तुटपुंजा असणारा हेक्टरी फक्त ९ लाखांचा मोबदला तीन ते चार वर्षांपूर्वी दिला गेला आहे. मागील भाजप सरकारने प्रकल्पग्रस्तांना तुटपुंजा मोबदला दिला. आघाडी सरकारमध्ये मी स्वत: पाठपुरावा करून भाम प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला मिळून देण्यासाठी प्रयत्नशील राहील. त्यानुसार मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी मी केली आहे.
- हिरामण खोसकर, आमदार इगतपुरी