घोटीत भाजीपाल्याची आवक वाढल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी ; नागरिक त्रस्त

इगतपुरीनामा न्यूज, दि. १८
इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उष्णता वाढल्याने टोमॅटो, काकडी, मिरची, कोबी, फ्लॉवर, गिलके आदी भाजीपाल्याचे उत्पादन वाढले आहे. हा भाजीपाला विक्रीसाठी ट्रॅक्टर, टेम्पो आदी वाहनातुन शेतकरी बांधव घोटी कृषी ऊत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत. भाजीपाल्याचे उत्पादन वाढल्याने बाजारभाव कोसळला असुन उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषी ऊत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या कृषी उत्पादनात अचानक झालेल्या वाढीमुळे भाजीपाल्याचे भाव कोसळले आहेत. शेतकरी बांधवांना भाजीपाल्याला एकीकडे भाव मिळत नसतांना घोटीकरांनाही मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. कृषी ऊत्पन्न बाजार समिती ते मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल किनारा पर्यंत दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे. परिणामी एसटी बसला देखील बस स्थानकापर्यंत येता येत नसल्याने महामार्गावरच प्रवाशांना उतरुन घोटीत पायी जावे लागत आहे. तर एसटी बस स्थानकातील प्रवाशांना बस पकडण्यासाठी पायपीट करीत महामार्गापर्यंत यावे लागत आहे. उन्हाचा पारा वाढल्याने वाहतुक कोंडीचा फटका एसटी बसने प्रवास करणारे जेष्ठ नागरिक प्रवाशी, महीला व विद्यार्थी यांना बसत आहे. या वाहतुक कोंडीमुळे महामार्गापासुन दोनशे मीटर अंतरावर असलेल्या घोटी ग्रामीण रुग्णालयात जाण्यासाठी रूग्णवाहीकेलाही अर्धातास लागत आहे. रोजच होणारी वाहतुक कोंडी सुरळीत करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक व प्रवाशी करीत आहे.

घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढल्याने घोटीत लागलेल्या वाहनांच्या रांगा.