
विजय पगारे : इगतपुरीनामा न्युज, दि. २
दिवाळी म्हणजे मांगल्याचा आणि प्रकाशाचा उत्सव. परंतु आता दिवाळी हा खरेदीचाही उत्सव झाला आहे. पुजेच्या साहित्याबरोबर आता इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन खरेदीसह घर खरेदीला देखील दिवाळीचा मुहूर्त साधला जात आहे. दिवाळीनिमित्त मुख्य बाजार पेठेच्या भागाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झालेले पहायला मिळाले. दिवाळी सणामुळे सर्वत्रच आनंदाचे, चैतन्याचे वातावरण आहे. या दिव्यांच्या सणासाठी बाजारपेठा विविध वस्तूंनी सजल्या आहेत. सध्या सगळीकडे आकाश कंदील, रांगोळ्या, पणत्या, फटाके आणि खासकरून कपड्यांची दुकाने सजली आहेत आणि ग्राहकही या वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत.
दिवाळीनिमित्त खरेदीसाठी इगतपुरी घोटी शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढली आहे. रस्त्याच्या दुतर्फा तसेच घोटीत तर डिव्हायडरवरही या विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. यामुळे या रस्त्यावर चालणेदेखील अवघड झाले होते. आजपासुन दिवाळीला सुरुवात झाली असुन येत्या गुरुवारी लक्ष्मीपूजनाचा दिवस असल्यामुळे पूजेचे साहित्य, फराळ, मिठाई, खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी होत आहे.
पूजेच्या साहित्याला मागणी : शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. दिवाळीमुळे इगतपुरी – घोटी शहरात चैतन्य पसरले आहे. संपूर्ण शहर प्रकाशोत्सवाच्या पर्वामुळे उत्साहीत झाले आहे. लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या पूजेच्या साहित्याने बाजारपेठ सजली होती. सकाळ पासूनच शहरातील बाजारपेठेत विविध साही त्याच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती.
इलेक्ट्रॉनिक वस्तुंची जोरात खरेदी : कुछ मिठा हो जाए : इलेक्ट्रॉनीक वस्तू खरेदीसाठी ग्राहकांमध्ये चांगला उत्साह पहायला मिळाला. शहरातील जवळ-जवळ सगळ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या शोरुमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली. इलेक्ट्रॉनिक वस्तुंमध्ये यंदा एलईडी टीव्हीला मोठी मागणी होती. फ्रीज, वॉशिंग मशिनला देखील मोठी मागणी होती. भारतीय संस्कृतीत गिफ्ट देण्यासह नातेवाईकांचे गोडधोड पदार्थ देऊन स्वागत करण्याची पध्दत आहे. करंजी, लाडू आदी फराळा बरोबरच मिठाई खरेदीसाठी स्वीट मार्टमध्ये नागरिकांची गर्दी वाढत आहे. यंदा काजूकतली, रिअल फ्रूटबरोबरच शुगर फ्री मिठाईलाही मागणी आहे. मिक्स मिठाई, बंधन मिक्स, काजू कमल भोग, शुगर फ्री पंचम आदी प्रकारची विविध मिठाई उपलब्ध झाली आहे. आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकणारे चांदीचा वर्ख, ग्लुकोज आणि भडक रंग वापरलेली मिठाई खरेदीचा मोह टाळावा असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
लक्षवेधी आकाशकंदिल : निरनिराळ्या आकाराचे लहानमोठे आकाश कंदील सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत. तर सुबक सुंदर पणत्या आणि नानाविध प्रकारचे रांगोळीचे रंग ग्राहकांना आकर्षित करत आहेत. सध्या फटाके उडवण्याचा कल कमी दिसत असला तरी बाजारात असलेले विविध प्रकारचे फटाके घेण्यासाठीही गर्दी होत आहे.
तयार फराळ खरेदी करण्यासाठी महिलांचा कल वाढला : दिवाळीत सर्वात महत्त्व असते ते फराळाला.दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य कितीही महाग झाले तरी घरोघरी आवर्जून दिवाळीत सर्व प्रकारचा फराळ केला जातो. महिला वर्ग नोकरी धंद्यानिमित्त मोठय़ा प्रमाणावर कामासाठी बाहेर पडत असल्याने तयार फराळ खरेदी करण्यासाठी महिलांचा कल वाढला आहे. एखादा दुसरा पदार्थ घरी करून बाकी फराळ मात्र बाहेरून आणण्याकडेच महिला वर्गाचा ओढा आहे. यामुळे तयार फराळाला असलेल्या मोठ्या मागणीमुळे या दुकानांमध्ये खरेदीसाठी महिला वगार्ची गर्दी होताना दिसत आहे.