लोकांमध्ये विठ्ठल पाहणारे विठ्ठल लंगडे झाले इगतपुरी पंचायत समितीचे उपसभापती

संत एकनाथांना गाढवात देव दिसला कारण ते स्वतः देव होते. आमच्या विठ्ठलाला सुद्धा माणसांत देव दिसतो. आईवडिलांच्या संस्कारी शिकवणुकीतून जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी विठ्ठल लंगडे ह्या तरुणाला मिळाली. ह्यातूनच त्याने इगतपुरी तालुक्यातील अनेक गोरगरिबांचे प्रश्न लीलया सोडवले. लोकांमध्ये विठ्ठल पाहणारा विठ्ठल लंगडे पंचायत समितीच्या उपसभापतीपदी विराजमान झाले आहेत.

विठ्ठल भगीरथ लंगडे हे तळोघ ह्या अतिशय छोट्या गावातील व्यापक विचारांचे व्यापक व्यक्तिमत्व…. शालेय जीवनापासून लोकांच्या समस्या, अडचणी सोडवण्यासाठी मिळालेली शिदोरी त्यांनी आतापर्यंत योग्य प्रकारे वापरली. कुटुंबाच्या उपजीविकेसाठी घोटी गावात दरमहा सात हजार रुपये पगारावर खासगी नोकरी हा युवक करतो. नोकरी करता करता अनेक सामान्य लोकांच्या प्रश्नांना त्यांनी वाहून घेतले. अनेक वर्षांपासून निराधार, वृद्ध, अपंग, विधवा, परित्यक्त्या व्यक्तींना संजय गांधी योजनेतून अर्थसहाय्य मिळावे म्हणून त्यांनी सर्वोत्तम काम केले आहे. शेकडो लाभार्थी त्याचा सुयोग्य वापर करीत आहेत. विभक्त कुटुंबातील अनेकांना स्वतंत्र शिधापत्रिका नसल्याची बाब हेरून त्यांनी अनेकांना शिधापत्रिका दिली. बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराला लावण्यासाठी विविध बँकांकडून त्यांना कर्ज मिळवून दिली. हे सर्व करीत असताना गरीब शाळकरी विद्यार्थ्यांच्या अत्यावश्यक गरजा ध्यानांत घेऊन त्यांना विविध शैक्षणिक साहित्य ते नेहमीच वाटप करतात. गावोगावी असणारी पाण्याची टंचाई पाहून त्यांचे दुःखी झालेले मन त्यांना कार्यप्रवृत्त करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरतात अन संबंधित भागात पाण्याच्या उपाययोजना सुरु होतात. आपल्या भागातील गावागावांत त्यांचा प्रचंड लोकसंपर्क आहे. ह्या भागातीलच नव्हे तर इगतपुरी तालुक्याच्या कानाकोपऱ्यात लग्नसराईच्या काळात लग्नांना उपस्थित राहून काय हवे काय नको याची ते देखरेख करतात. दुःखदायक प्रसंगी दुःखात असलेल्या कोणत्याही व्यक्तीला भेटून ते दुःख हलके करण्यास मदत करतात. अपघातप्रसंगी तर ते देवासारखे मदतीला धावून जातात. इतकेच नाही तर गावोगावी ते लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच धावत असतात.

कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असूनही त्यांचा चांगले कार्य करण्याचा पिंड मात्र सुटत नाही. यामुळेच आगरी सेनेने त्यांची दखल घेऊन त्यांना आगरी सेनेच्या तालुकाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली होती. पंचायत समितीच्या शिवसेना गटनेतेपदाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. परिस्थिती नसल्याने लोकांनी अक्षरशः वर्गणी काढून त्यांना निवडणुकीसाठी मदत केली होती. निवडून आल्यापासून आजपर्यंत म्हणजे उपसभापती होईपर्यंत हा विठ्ठल लोकांसाठी आजही धावतोच आहे. लोकांमध्ये विठ्ठल पाहता पाहता आपलं जीवनच अवघं विठ्ठलमय करणाऱ्या विठ्ठल लंगडे यांची इगतपुरी पंचायत समितीच्या उपसभापती पदावर सार्थ निवड झाली आहे. त्यांचे विशेष अभिनंदन करतो.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!