
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील प्रमुख रस्ता असणाऱ्या अस्वली ते साकुर फाटा रस्त्यावर पावसामुळे ब्रिटिशकालीन वडाची झाडे पडण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. दोन तीन दिवसात अनेक झाडे पडली. त्यामुळे ह्या रस्त्यावरून वाहतूक बंद झाली असून शेतकऱ्यांना शेतीकडे जाणे अवघड झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणाऱ्या एसएमबीटी रुग्णालयाकडे हा रस्ता जात असल्याने रुग्णवाहीका, डॉक्टर, विद्यार्थी यांना पर्यायी मार्गाने जावे लागते आहे. तालुका प्रशासन आणि बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. फांद्याची छाटणी दरवर्षी करण्याकडे कोणाचेही लक्ष नसते. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र प्रशासन जीवितहानी झाल्यावर जागे होणार का असा सवाल या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे. झाड पडल्यामुळे अमोल शहाजीराव गुळवे यांच्या फार्मचे प्रवेशद्वार, तारेचे कंपाउंड यांच्यासह भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंत्रणेने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी अमोल गुळवे यांनी केली आहे. रविवारी रस्त्याच्या बाजूला असलेले वडाचे झाड मुळासहित उन्मळून रस्त्यावर पडले. झाड रस्त्यावर पडले असल्याने वाहतुकीवर मात्र परिणाम झाला आहे. ह्या रस्त्याच्या बाजूला असलेली जीर्ण झाडे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांच्या अंगावर कधी पडतील याचा नेम नाही. या घटनेमुळे मात्र वाहनधारकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जीर्ण व कमकुवत झाडे तोडणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. परंतु पर्यावरणाचे निमित्त पुढे करून या झाडांच्या तोडीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे दरवर्षी अनेक झाडे किंवा झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडण्याचा प्रकार सर्रास पहावयास मिळतो.