इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
राज्य शासन ग्रामविकास विभागाच्या महा आवास अभियानांतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून यशस्वी ठरलेल्या इगतपुरी तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायतीला नाशिक विभागस्तरीय “सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत” पुरस्कार मिळाला आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते हा पुरस्कार आज वितरित करण्यात आला. बोर्लीच्या सरपंच मथुरा झुगरे, उपसरपंच गोविंद भले, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र झुगरे, ग्रामसेवक महेंद्र पाटील यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कार स्वीकारला. इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, विस्ताराधिकारी संजय पवार, ज्ञानेश्वर कऱ्हाळे आदींनी ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले आहे.
महाआवास अभियान ग्रामीण मधील उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती संस्था यांना पुरस्कार वितरण करण्यात येते. केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, राज्य शासन पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच गुणात्मक प्रगती व्हावी ह्या उद्धेशाने २० नोव्हेंबर २०२० ला राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून राज्यात १०० दिवसांचे “महा आवास अभियान ग्रामीण’ आयोजित करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हास्तरावरून प्राप्त प्रस्तावांची छाननी करून विभागीय स्तरावरील महा आवास अभियान पुरस्काराची निवड करण्यात आलेली होती. यामध्ये इगतपुरी तालुक्याच्या ग्रामीण अतिदुर्गम भागातील बोर्ली ग्रामपंचायतीने “सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत” हा नाशिक महसूल विभागस्तरीय पुरस्कार पटकावला.
नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. बोर्लीच्या सरपंच मथुरा झुगरे, उपसरपंच गोविंद भले, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र झुगरे, ग्रामसेवक महेंद्र पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला. इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायतीला मिळालेल्या पुरस्काराने सर्वांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल असे गौरवोद्गार इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी काढले. त्यांच्यासह विस्ताराधिकारी संजय पवार, ज्ञानेश्वर कऱ्हाळे आदींनी बोर्ली ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले आहे.