आमदार खोसकरांच्या प्रयत्नांनी इगतपुरीतील जुन्या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी ६ कोटी ३० लाखाचा निधी मंजुर

 वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

इगतपुरी शहरातील एकमेव जुन्या मुंबई आग्रा महामार्गाची अवस्था गेल्या चार पाच वर्षापासुन अत्यंत दयनीय झाली आहे. रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी अनेक पक्षांच्या पदाधिकारी, विविध संघटना यांनी रास्ता रोको, आंदोलने निवेदने दिली. मात्र प्रशासनाकडुन कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने नागरीकही हतबल झाले होते. अखेर आमदार हिरामण खोसकर यांनी इगतपुरी शहरातील नवीन रस्त्यासाठी तब्बल ६ कोटी ३० लाख रुपयाचा निधी मंजूर केल्याची माहिती दिली. ह्या रस्त्याच्या कामाला पावसाळ्यानंतर दिवाळीच्या आसपास सुरुवात होणार आहे. गणेशोत्सव व नवरात्रोत्सव जवळ येत असल्याने या रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांत तात्पुरत्या स्वरूपात मुरुम टाकुन रस्त्याची डागडुजी करण्याच्या सुचना आमदार खोसकर यांनी दिल्या.

या निधीमुळे इगतपुरी वासियांच्या रस्त्याचा प्रश्न सुटल्याने आमदार खोसकर यांचे आभार मानण्यात आले. इगतपुरी शहरातील मुख्य रस्ता ( जुना मुंबई-आग्रा महामार्ग ) रस्त्याची झालेली चाळण व खड्डे यामुळे इगतपुरीकर अत्यंत त्रस्त झाले होते. रस्त्यावर पडलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहन चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत होती. तसेच पावसाळ्यात खड्ड्यांतील साचलेल्या पाण्यामुळे व चिखलामुळे नागरीकांना पायी चालणेही मुश्कील झाले होते.

शहरातील या मुख्य रस्त्यावर रेल्वे स्टेशन, तालुका न्यायालय, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, नगर परिषद कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, विश्व विपश्यना विद्यापीठ, विविध शाळा व मुख्य बाजारपेठ असल्याने इगतपुरीतील या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच नैसर्गिक सौंदर्य लाभलेलेल्या या इगतपुरी शहराला FOGG CITY ( धुक्याचे शहर ) म्हणुनही ओळखले जात असल्याने इगतपुरीत पर्यटकांचीही मोठी वर्दळ असते.

मागील आठवड्यात इगतपुरी शहरात मुख्य रस्त्यावर रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी इगतपुरी वासियांकडुन आंदोलन सुरु होते. यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत इगतपुरी वासियांना नवीन रस्त्यासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगितले होते. चार कि. मी. च्या नवीन रस्त्यासाठी याच महिन्यात अगोदर १ कोटी ३० लाख व आता ५ कोटी निधी मंजूर केला. पत्रकार परिषदेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे, शहराध्यक्ष वसीम सय्यद, युवक शहराध्यक्ष ज्ञानेश्वर पासलकर, माजी नगरसेवक मिलिंद हिरे, प्रवीण कदम, कार्याध्यक्ष दीपक मावरीया, निजाम खान, प्रथमेश पुरोहित आदी उपस्थित होते.

आमदार झाल्यापासुन इगतपुरी शहर वासियांनी रस्ता दुरुस्त करावा याबाबत वेळोवेळी मागणी केली होती. मात्र कोरोनाचे मोठे संकट आल्याने विकास कामासाठी राज्य सरकारकडुन निधी उपलब्ध होत नव्हता. मात्र आता कोरोनाचा कहर कमी झाल्याने विकास कामासाठी निधी मिळु लागल्याने इगतपुरी शहरासह मतदार संघाचा मोठया प्रमाणात विकास करणार असुन शहरातील रस्त्यासाठी ६ कोटी ३० लाख रुपयाचा निधी मंजुर केला. सध्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
- हिरामण खोसकर, आमदार

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!