इगतपुरीनामा न्यूज, दि. २७
इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे बिबट्याची दहशत वाढल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. गुरुवारी पहाटे ग्रामपंचायत कर्मचारी केरू ठाणगे यांच्या वासरावर हल्ला करून जीव घेतला. यामुळे नागरिकांमध्ये अधिक दहशत वाढल आहे. वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे बसवावेत, केरू ठाणगे यांच्या परिवाराला नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी गोंदे दुमालाचे सरपंच शरद सोनवणे यांनी केली आहे.
गोंदे दुमाला हे गाव आणि परिसर अत्यंत वर्दळीचा परिसर आहे. प्रत्येक रस्त्याने कोणी ना कोणी सतत ये जा करीत असते. त्यामुळे वन्य प्राण्यांचे दर्शन सुद्धा क्वचित होते. असे असूनही काल गुरुवारी पहाटेच्या सुमारास गावालगत बिबट्याचे दर्शन झाले. जवळच राहणारे ग्रामपंचायत कर्मचारी केरू ठाणगे यांच्या वासरावर हल्ला करून बिबट्याने फडशा पाडला. यामुळे नागरिक आणि कामगार वर्गामध्ये मोठी घबराट पसरली आहे.
ह्या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. नागरिकांमधील दहशत कमी करावी. केरू ठाणगे यांना नुकसानभरपाई द्यावी. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तात्काळ पिंजरे लावावेत अशी मागणी गोंदे दुमालाचे सरपंच शरद सोनवणे यांनी केली आहे.