महाराष्ट्र विधानमंडळाच्या समितीकडून इगतपुरीच्या कृषी विभागाचे कौतुक : कृषी विभागाच्या परिणामकारक योजनांमुळे शेतकऱ्यांचा फायदा

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४

महाराष्ट्र विधान मंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीने  इगतपुरी तालक्यातील मुंढेगाव येथे भेट देऊन कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेची पाहणी केली. समितीचे सदस्य आमदार अनिल पाटील, राजेश पाडवी, रमेश पाटील यांनी ह्याबाबत इगतपुरी कृषी विभागाच्या योजनांबाबत समाधान व्यक्त केले. समितीच्या सदस्यांनी अनुदानावर  वाटप करण्यात आलेले भात लावणी यंत्र, काढणी यंत्र ( रीपर ), ट्रॅक्टर, रोटाव्हेटरची पाहणी करून लाभार्थी शेतकऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांना होत असलेल्या फायद्यामुळे शासनाच्या योजनेचा उद्धेश सफल होत असल्याबाबत समितीने तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर यांचे विशेष कौतुक केले. यासह कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही अभिनंदन केले.

यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक श्री. सोनवणे यांनी आमदार महोदयांना कृषी औजारांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाविषयी सविस्तर माहिती दिली. इगतपुरीचे  तहसीलदार परमेश्वर कासुळे, सभापती सोमनाथ जोशी, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर, संजय सूर्यवंशी उपस्थित होते. मंडळ कृषी अधिकारी भास्कर गीते, अनिल मुजगुडे, रामा दिघे, चंद्रशेखर अकोले, किशोर भरते, संजय पाटील, कृषी सहाय्यक प्रियंका पांडूळे,जयश्री गांगुर्डे, वंदना शिंगाडे, मोहिनी चावरा, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हितेंद्र मोरे आदींनी सहभागी घेतला.