कवितांचा मळा : आला आला ग मुऱ्हाळी

रचना : ॲड. पांडुरंग ग. काजळे, नांदूरवैद्य

आला आला ग मुऱ्हाळी
मुळ घेवुन सासरी ……
सरला लावणीचा शिन
सांज झाली ग हासरी …….

कधी सरल ही रात
कधी उगल ग दिस …….
झोप येईना ग डोळा
लागली माहेराची आस …..

ओवाळण्या भाऊराया
मन धावे हे सुसाट
ओढ लागली भावाची
कधी सरल ही वाट ….

राखी प्रेमाची घेऊन
उद्या माहेरा जाईन….
वैभव भावाचं माह्या
मी आजन्म पाहीन…..