प्रभाकर आवारी, इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
कल्पतरू ( जेएमटी कं. पाडळी देशमुख ) फाउंडेशन पाडळी देशमुख येथे आरोग्य उपकेंद्रासाठी सुसज्ज इमारत व रुग्णवाहिका देणार आहे. पुढील महिन्यात या इमारतीच्या कामाला प्रारंभ होणार असून सर्व अत्याधुनिक सुविधायुक्त रुग्णवाहिकाही येत्या ८ दिवसांत उपलब्ध होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. याबाबत कल्पतरू फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान ग्रामपंचायतीने केला.
आरोग्य विभागाच्या पाडळी देशमुख येथील चुकीच्या जागेवर बांधलेल्या इमारतीचा आरोग्य विभागाने ताबा न घेतल्याने ती इमारत २० वर्षांपासुन केलेल्या बांधकामापासून ते आजतागायत तशीच आहे. ती इमारत मोडकळीस आली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यावर पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे व उपसरपंच बाळासाहेब आमले यांच्यासह माजी सदस्य कैलास धांडे यांनी कल्पतरू ( जेएमटी कं. पाडळी देशमुख ) फाउंडेशनकडे पाठपुरावा केला. दवाखान्याची इमारत मिळावी यासाठी पाठपुरावा केल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाचे मुख्य अधिकारी निळकंठेश्वर, सारंग पांडये, बिरेंद्र रॉय, संतोष मोरे यांनी पाडळी देशमुख गावात येऊन सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले व ग्रामस्थां समवेत पाहणी केली. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची व ग्रामस्थांची बैठक घेऊन लगेचच दवाखान्यासाठी ६०० स्क्वेअर फूट सर्व सुविधांयुक्त इमारत मंजूर केली. त्याचे काम सप्टेंबर महिन्याच्या १० तारखेला प्रत्यक्षात सुरू करण्यात येणार आहे. याचवेळी सर्व अत्याधुनिक सुविधांयुक्त रुग्णवाहिकाही येत्या आठ दिवसांत नागरिकांच्या सेवेत दाखल करू असेही त्यांनी सांगितल्यावर नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी कल्पतरू फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. हे काम मंजुर व्हावे यासाठी पाठपुरावा करणारे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचेही ग्रामस्थांनी आभार मानत समाधान व्यक्त केले. आदिवासी संघटनेचे तुकाराम वारघडे, माजी सरपंच पोपटराव धांडे, सोसायटी चेअरमन रामभाऊ धांडे, माजी अध्यक्ष विष्णु धोंगडे, कचरू धांडे, कृष्णा चौधरी, रतन धांडे, दिलीप धांडे, दीपक धांडे, योगिता धोंगडे, अर्चना धांडे, सुमन धांडे, ग्रामसेवक संदीप निरभवणे, दत्ता धोंगडे, भगवान शिंदे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोग्य उपकेंद्रासाठी कल्पतरू फाउंडेशन इमारतीसह रुग्णवाहिका देणार आहे. यामुळे पाडळी देशमुख, मुकणे, शेणवड खुर्द आदी मोठ्या लोकसंख्येच्या गावांसह जवळील महामार्गावर होणाऱ्या अपघातग्रस्तांसाठी दवाखाना व रुग्णवाहिकेचा मोठा उपयोग होणार आहे. याकामी माझ्यासह उपसरपंच बाळासाहेब आमले व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनीही चांगला पाठपुरावा केल्याने मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.
- खंडेराव धांडे, सरपंच पाडळी देशमुख