नगरविकासमंत्र्यांच्या हस्ते आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांचा सन्मान

वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १६

कसारा घाटात प्रवासादरम्यान मोठ्या प्रमाणात अपघात होतात. अपघातानंतर योग्यवेळी मदत न मिळाल्यामुळे अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागते. त्यामुळे अपघात होताच लोकांना तात्काळ उपचार व मदत मिळावी ही संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन इगतपुरी, कसारा, खर्डी, शहापूर, वासिंद आणि पडघा येथील २० ते ४० वयोगटातील २२० तरूणांनी एकत्र येत आपत्ती व्यवस्थापन टीम हा व्हाट्सअप ग्रुप बनवला. ग्रुपच्या माध्यमातून टीमने कोरोना काळात अन्नछत्र सुरु करीत हजारो लोकांच्या जेवणाचा प्रश्न सोडवत असतांना अतिवृष्टी असो वा अन्य कुठलीही आपत्ती अपघात असो हा ग्रुप मदतीसाठी सदैव पुढे असतो. ठाणे व नाशिक जिल्ह्यातील मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या कसारा घाटात देवदूतासारखी धाव घेऊन आपत्ती व्यवस्थापन टीमने आतापर्यंत १५७ लोकांचे विविध अपघातातून प्राण वाचवले आहेत.

त्यांच्या कार्यांची दखल घेत १५ ऑगस्टला ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आपत्ती व्यवस्थापन टीम शहापुर, कसारा या ग्रुपचा सन्मान केला. नगरविकास मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्याचा गौरव झाला. शहापूरच्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी व शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांचे मार्गदर्शन ह्या टीमला असते. एखादी दुर्घटना घडल्यास कल्याण किंवा भिवंडी या जवळच्या महापालिकांमधून मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन टीम बोलावली जाते. मात्र, कल्याण, भिवंडीपासून कसारा ६० किलोमीटर अंतर असल्याने ते उशिरा घटनास्थळी पोहचतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारची आपत्ती आल्यास कसारा आपत्ती टीममधील गावकरीच सर्वांत प्रथम घटनास्थळी पोहोचुन मदत करतात. शिवाय, ही टीम अपघात, भूस्खलन, पूर, बुडणे किंवा रेल्वे अपघातांमध्ये मदत करतात. विशेष म्हणजे श्याम धुमाळ यांची टीम सर्वात प्रथम घटनास्थळी पोहचण्यासाठी सर्व टीमचे सदस्य व्हॉटस् अॅप ग्रृपच्या माध्यमातून एकमेकांशी चांगले जोडलेले आहेत. या टीमने जीवाची बाजी लावून आतापर्यत अनेक लोकांचे जीव वाचवले आहेत. अपघातग्रस्ताला मदत करताना एक पैसाही आकारत नाहीत.

कसारा घाटात पाच वर्षात सुमारे ४५० अपघात झाले आहेत. अपघात होताच आपत्ती टीमच्या सदस्यांना ताबडतोब फोनवरून घटनेची माहिती मिळताच टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल होतात. अपघातांमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढुन उपचारासाठी वेळेत पोहोचवतात. शिवाय या टीममधील सदस्य खोल दरीत उतरतात. मदतकार्य करताना त्यांच्या स्वतःच्या सर्व उपकरणांसह अडकलेल्या नागरिकांना मदतकार्य देतात. या टीमने सामाजिक बांधिलकी राखत लॉकडाऊन काळातही घाटातून पायी जाणाऱ्या लोकांना जेवणाची सोय केली होती. या टीमच्या सर्व सदस्यांचा एकच ध्यास आहे. तो म्हणजे जास्तीत जास्त मदतकार्य करणे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!