घोटीत ७० वर्षीय बेवारस वृद्धाचा मृत्यू: ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११

घोटी येथील ग्रामीण रुग्णालयासमोर ७० ते ७५ वर्षीय बेवारस व्यक्तीला आज अचानक त्रास झाला. येथून जाणाऱ्या नागरिकांनी ह्या वृद्धाला उपचारासाठी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वृद्ध व्यक्तीला तपासून मृत झाल्याचे घोषित केले. घोटी पोलिसांनी ह्या घटनेची नोंद घेतली आहे.

मृत झालेल्या बेवारस वृद्धाचे वय अंदाजे ७० ते ७५ वर्षे आहे. अंगात सफेद रंगाचा कुर्ता पायजमा, सफेद रंगाची कोपरी, सफेद रंगाची लेंगा पॅन्ट, दाढी मिशा वाढलेल्या आणि सफेद झालेल्या आहेत. उजव्या हाताच्या कांबीवर सुखदेव नाव गोंदलेले आहे. ह्या इसमाची ओळख पटवण्याबाबत कोणाला काही माहिती असल्यास घोटी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घोटीचे पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा गंधास, पोलीस कर्मचारी शरद कोठुळे यांनी तपास सुरू केला आहे.