धामडकीवाडीच्या आदिवासी बांधवांना नाशिकच्या युवकांकडून भोजनदान

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११

लॉकडाऊन आणि कोरोना काळामुळे आदिवासी भागातील रोजंदारी करणाऱ्या आदिवासी बांधवांचे खूपच हाल होत आहे. इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम असणाऱ्या धामडकीवाडी येथे मोठ्या प्रमाणात रोजंदारी करणारे आदिवासी बांधव  राहतात. त्यांना दिलासा देऊन जेवणाची मदत व्हावी याउद्देशाने नाशिक येथील युवा फ्रेंड सर्कलतर्फे भोजनदान करण्यात आले. एक किलोमीटर जंगली भागातून पायपीट करून युवकांनी आदिवासी बांधवांची ख्यालीखुशाली विचारून त्यांना अन्नदान केले. आदिवासी बांधवांनी युवकांचे आभार मानले आहेत.

इगतपुरी तालुक्याच्या अतिदुर्गम आणि रस्ता नसलेल्या भागात असलेल्या धामडकीवाडी ही आदिवासी वस्ती आहे. कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे येथील आदिवासी बांधवांचा रोजगार कमी झाला. याबाबत नाशिकच्या युवा फ्रेंड सर्कल ह्या सामाजिक कार्य करणाऱ्या उदयोन्मुख तरुणांच्या ग्रुपला माहिती समजली. अन्नदान हे पुण्यकर्म असल्याचे मानून हे युवक विविध भागांत भोजनदान करण्यासाठी आघाडीवर आहेत. त्यानुसार धामडकीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते प्रमोद परदेशी यांनी युवकांना साहाय्य केले.

यानुसार संपूर्ण धामडकीवाडी येथील संपूर्ण आदिवासी बांधव आणि भगिनींना युवा फ्रेंड सर्कलतर्फे सुग्रास भोजन देण्यात आले. रस्त्यापासून एक किलोमीटर पायपीट करून भर पावसात युवकांनी ह्या वाडीत हा उपक्रम राबवला. जिल्हा परिषद शाळेच्या आवारात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी नागरिकांशी संवाद साधून युवकांनी समस्या जाणून घेतल्या. यावेळी तृप्त झालेल्या आदिवासी नागरिकांनी युवकांचे आभार मानले. आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांच्या नियोजनानुसार युवा फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष सार्थक कपूर, चेतन चौधरी, श्रीराम सोनवणे यांनी अन्नदान उपक्रम आयोजित केला   होता. सहकारी शिक्षक दत्तू निसरड, गोकुळ आगीवले, बबन आगीवले, वाळू आगिवले, पांडुरंग आगिवले, दिनकर आगिवले आदींनी सहकार्य केले.

धामडकीवाडी येथील लोक गरीब आहेत पण स्वाभिमानी आहेत. त्यामुळे त्यांना सहकार्य करणे ही आपली जबाबदरी आहे हा एकमेव उद्देश ठेवून कार्य सुरू आहे. प्रमोद परदेशी यांचे मोलाचे साहाय्य मिळाल्याने उपक्रम सुंदर झाला.

- सार्थक कपूर, अध्यक्ष युवा फ्रेंड सर्कल, नाशिक

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!