“इगतपुरीनामा”च्या बातमीने बेपत्ता युवा शिक्षक सापडले : वाडीवऱ्हे पोलिसांनी शिक्षकाला कुटुंबीयांकडे केले सुपूर्द

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९

काही दिवसांपूर्वी निनावी येथून बेपत्ता झालेले घोटी खुर्द  येथील युवा शिक्षक चेतन रुंजाजी फोकणे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर सुखरूप आढळून आले आहेत. “इगतपुरीनामा” मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे हे शिक्षक पोलिसांच्या निदर्शनास आले. ते सुखरूप मिळून आल्याने सर्वत्र “इगतपुरीनामा” आणि वाडीवऱ्हे पोलिसांचे कौतुक होत आहे.

काही दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील अडसरे येथे येथे माध्यमिक शिक्षक असलेले ३३ वर्षीय चेतन रुंजाजी फोकणे शाळेत गेले असतांना पत्नीला त्यांनी फोनवरून खाजगी कामासाठी संस्थाचालकांसोबत बैठक असल्याचे कळवले होते. त्यानंतरही ते घरी न परतल्याने पत्नी मंगल फोकणे यांनी पती बेपत्ता झाल्याची तक्रार वाडीवऱ्हे पोलिसात दिली होती. या घटनेचे वृत्तांकन इगतपुरीनामा वेब पोर्टलने केले होते.

सोशल मीडियावर ह्याबाबत फोटोसह बातमी फिरत असतांनाच ती बातमी नाशिकरोड रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यांना चेतन फोकणे हे नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरात असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. याबद्दल त्यांनी तातडीने वाडीवऱ्हे पोलिसांना कळवल्यानंतर सदर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन कुटुंबियांच्या ताब्यात दिले.

वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शाम सोनवणे, पोलीस हवालदार गोविंदसिंग परदेशी, विलास धारणकर, प्रवीण भोईर आणि सहकाऱ्यांनी ह्याप्रकरणी साहाय्य केले.