इगतपुरीच्या स्वर्गीय निसर्गसौंदर्यात उदयाला आलेले “कपारेश्वर महादेव” मंदिर

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९

इगतपुरी तालुक्याला रामायण कालीन आणि महाभारतकालीन इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. ह्याच्या पाऊलखुणा आजही इगतपुरी तालुक्याच्या विविध भागात आढळून येतात. प्रभू श्रीरामाच्या वनवास काळात ही भूमी पावन झालेली आहे. प्रभू श्रीराम यांचे आराध्यदैवत म्हणजे शिव शंकर. ह्या शंकराची पूजा प्रार्थना करतांना रामरायांनी स्थापलेली अनेक शिवलिंगे आहेत. असेच अनेक वर्षे कोणाच्या दृष्टीला न पडलेले एक शिवलिंग इगतपुरी जवळ असलेल्या दुर्गम भागात डोंगराच्या कपारीत आढळून आले. तळेगाव येथील दुर्गभ्रमण करणाऱ्या युवकांना आढळून आलेल्या ह्या ऐतिहसिक शिवलिंगाची त्या युवकांनी स्थापना केली. नयनरम्य निसर्ग आणि शिवलिंगाला आच्छादन देणारी धुक्याची चादर असा आकर्षक नजारा येथे पाहायला मिळतो. अर्थातच हे ठिकाण आता पर्यटकांचे आकर्षणबिंदू ठरले आहे. कपारीत असलेला महादेव म्हणून “कपारेश्वर महादेव” अशी ह्या स्थळाची ख्याती सर्वदूर झाली आहे.

वर्षभरापूर्वी कोरोना काळात तळेगाव येथील काही तरुण तळेगाव डॅम येथील डोंगरावर भटकंती करत होते. ह्या भटकंतीवेळी एका डोंगराच्या कपारीच्या दाट झाडीत त्यांना आकर्षक पुरातन शिवलिंग दिसले. ह्या युवकांनी आजूबाजूची झाडी तोडून काटे बाजूला सारले. शिवलिंग आणि परिसराची करण्यात आली. यासह इगतपुरीतील काही दानशूर व्यक्तींच्या सहाय्याने त्याच जागेत पुरातन शिवलिंगाची विधिवत स्थापना करण्यात आली. नियमितपणे शिवलिंगाचे विधिवत पूजन सुद्धा सुरू करण्यात आले.

अनेक शिवभक्तांना याबाबत माहिती मिळाल्यावर येथे नेहमीच भाविकांची गर्दी सुद्धा वाढू लागली. यामुळे ह्या परिसरात भाविकांना बसण्यासाठी बाकांची सोय करण्यात आली आहे. आजूबाजूचे भौगोलिक वातावरण चिखलयुक्त आणि निसरडे असल्याने फरच्या सुद्धा बसवण्यात आल्या आहेत. मुंबई आग्रा महामार्गाजवळील हॉटेल ग्रीनलँड समोरून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर हे स्थळ आहे. पायथ्यापासून साधारण 1 किलोमीटर डोंगरावर पायवाटेने चढावे लागते. आजूबाजूचा परिसर हिरवाईने नटलेला आहे. शिवपिंडीच्या बाजूला वरून खाली वाहणारा धबधबा, चित्ताकर्षक दरी, डोंगरावर आच्छादलेली धुक्याची चादर असे निसर्गरम्य दृश्य परिसरात दिसते. कपारीत असलेले जागृत कपारेश्वर महादेव भक्तांचे लक्ष वेधून अंत:करणाला प्रसन्नता देतात. एकदा येथे भेट दिली तर वारंवार जाण्याचा मोह होईल असे हे नवीन पर्यटन स्थळ उदयास आले आहे. शिवभक्तांना आनंद देणाऱ्या कपारेश्वर महादेवाचे दर्शन घ्यायला एकदा तरी जायलाच हवे.

त्यजोनी कर्म बंधने सारी चिदानंदी ठेवी मन ।
जपोनी शिवमंत्र षडाक्षरी करी स्व-संरक्षण ॥

रक्षोत देव मजला या भवसागरी ।
पाप नाश हो हृदयी मूळ मंत्राने सत्वरी ॥

विश्वमूर्ति जोतिर्मय सच्चिदात्मा आनंदधन रक्षा कर ।
अणूरेणूत सर्वत्र जी शक्ती निर्भय करी सत्वर ॥

भूतली रक्षी अष्टमूर्ति तू हे गिरीश शंकरा ।
नवजीवन जले देशी जलापासोनी रक्षी त्वरा ॥

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!