कामगार नेते देविदास आडोळे यांची जिल्ह्याबाहेर तडीपारी विभागीय आयुक्तांकडून रद्दबातल

वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २

सीटुचे जिल्हा उपाध्यक्ष कामगार नेते कॉ. देविदास आडोळे यांना इगतपुरी-त्र्यंबकेश्वरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी २४ डिसेंबर २०२० ला २ वर्षासाठी जिल्ह्याबाहेर तडीपारचा आदेश दिला होता. या आदेशाविरोधात आडोळे यांनी नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे अपिल दाखल केले होते. त्यानुसार वेळोवेळी सुनावणी होऊन विभागीय आयुक्तांनी अखेर उपविभागीय अधिकारी यांचा आडोळे यांना तडीपार करण्याचा आदेश रद्द केला.

अधिक माहिती अशी की, वाडीवऱ्हे, गोंदे दुमाला, इगतपुरी औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे व्यवस्थापन कामगारांचा छळ करणे, कमी पगार देणे, कुठलीही नोटीस न देता कामगारांना अचानक काढुन टाकणे आदी तक्रारी आहेत. ह्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी अनेक कंपनीच्या कामगारांनी देविदास आडोळे यांच्या नाशिक वर्कर्स युनियन सीआयटीयु चे  साहाय्य घेतले. त्यानुसार कामगारांवर अन्याय करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कामगारांना न्याय देण्यासाठी कंपनी बाहेर आंदोलने, संप, कामगार आयुक्त यांच्याकडे दाद मागुन युनियनच्या माध्यमातुन कामगारांना न्याय देण्याचे काम आडोळे करतात.

नोव्हेंबर २०२० मध्ये वाडीवऱ्हे भागातील एका कंपनीने कामगारांवर अन्याय केला म्हणुन देविदास आडोळे या कंपनी बाहेर कामगारांना घेऊन आंदोलन करत होते. यावेळी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याने शांतता व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता  व सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल म्हणुन देविदास आडोळे यांच्या विरोधात उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तडीपार करण्यासाठी प्रस्ताव सादर केला. त्याप्रमाणे उपविभागीय अधिकारी यांनी आडोळे यांना २ वर्षासाठी जिल्ह्याबाहेर तडीपार करण्याचा आदेश दिला होता.

या आदेशाविरोधात देविदास आडोळे यांनी विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडे अपिल दाखल केले होते. सुनावणी दरम्यान अपिलार्थीस त्यांच्या विरूध्द ठेवण्यात आलेल्या आरोपांचा, गुन्ह्याच्या आधारे अपिलार्थी हे समाजास मोठ्या प्रमाणावर घातक आहेत सबब  हद्दपार करणे आवश्यक आहे हे सिध्द करण्यास सामनेवाले समर्पक कारणे सादर करू न शकल्याने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी देविदास आडोळे यांना तडीपार करण्याचा आदेश रद्द केला. या आदेशाचे कामगार संघटना व कामगारांनी स्वागत केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!