शैलेश पुरोहित, इगतपुरीनामा न्यूज, दि. १
आज रविवारी मैत्री दिनाच्या शुभेच्छा सगळीकडे सुरू असताना त्र्यंबकेश्वरच्या एक जणाची मैत्री चक्क दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या पक्षाशी जुळली आहे. निर्लोभ मैत्रीमुळे पक्षाचे प्राण वाचले असून हा नवा चिमुकला मित्र त्याच्या घरची शोभा वाढवत आहे. काही दिवसांनी ह्या पक्षाला जंगलात सोडावे लागणार असले तरी ही मैत्री मात्र मनात का होईना अबाधित राहणार आहे.
झाले असे की, त्र्यंबकेश्वर जव्हार रोड, सितारा इन् हॉटेल जवळ मैत्री दिनाच्या दिवशी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान त्र्यंबकेश्वरचे पत्रकार मिलिंद तिवडे त्यांच्या बाईकवर जात होते. यावेळी त्यांना अचानक एक पक्षी हवेतून खाली रस्त्यावर पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ त्यांची दुचाकी थांबवून त्या पक्षाला आपुलकीने उचलून घेऊन पाणी पाजले. पडलेला पक्षी दुर्मिळ असा किंग फिशर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ पक्षीमित्र ज्ञानेश्वर सोनार यांना संपर्क साधून याविषयी माहिती दिली. त्यांनी ते पक्षाचे पिल्लू असून अजुन पूर्ण क्षमतेने उडू शकत नसल्याचे सांगितले. आता छोटा किंगफिशर पक्षी मिलिंद तिवडे यांच्या घरी पाहुणा म्हणून थांबवला आहे. तो उडण्यास परिपक्व झाल्यावर त्यास सोडून देण्यात येणार असल्याचे तिवडे यांनी सांगत मैत्री दिनाच्या दिवशी एक नवीन मित्र मिळाला असल्याची प्रतिक्रिया दिली. हा पक्षी अतिशय आकर्षक असून घरातील सगळे लहान थोर व्यक्ती त्याची आस्थेने काळजी घेत आहेत. हा पक्षी उडण्यास सक्षम झाल्यावर जंगलात सोडून मैत्री जपणार असल्याचेही मिलिंद तिवडे म्हणाले.