
इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र सरकार ग्रामविकास विभागाच्या पंचायत प्रगती निर्देशांक अंतर्गत सन २०२२-२३ च्या मूल्यांकनानुसार जाहीर केलेल्या निकालात नाशिक जिल्ह्यातील मोडाळे ग्रामपंचायतीने ६ वा क्रमांक पटकावून इगतपुरी तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशामुळे मोडाळे ग्रामपंचायतीकडून सक्षम नियोजन, सक्रिय लोकसहभागातून झालेली प्रगती आणि सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी अधोरेखित झाली आहे. मोडाळे ग्रामपंचायतने अखंडितपणे विकासाचा दृष्टिकोन ठेवून कार्यकुशल उपक्रम राबवले. ग्रामीण जीवनमान आणि लोकांच्या गरजांनुसार योजना अंमलात आणल्या. यामुळे ग्रामपंचायतीला हे मोठे यश लाभले आहे. माझ्या मोडाळे गावाची विकसित वाटचाल पाहून मला अतीव समाधान मिळते. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी राबवलेले विकासाभिमुख उपक्रम आणि कार्य कौतुकास्पद आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी दिली. २६ ऑगस्टला पुणे येथे ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या कार्यशाळेत ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या हस्ते मोडाळे ग्रामपंचायतीला सन्मानित केले जाणार आहे.
पंचायत प्रगती निर्देशांक हा बहु-क्षेत्रीय निर्देशांक असून तो सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि प्रशासनिक क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण प्रगतीचे गुणांकन करण्यात येते. स्थानिक स्वराज्य संस्थांची कामगिरी पारदर्शकतेने मोजून त्यांना विकासामध्ये कोणत्या क्षेत्रांत सुधारणा करणे आवश्यक आहे, हे अधोरेखित करणे हा या निर्देशांकाचा उद्देश आहे. शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पंचायतींनी केलेल्या प्रगतीचे मूल्यांकन करून जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत अशा तीन स्तरांवर या निर्देशांकाचे मूल्यांकन केले जाते. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेला राज्यात पहिला क्रमांक मिळाला आहे. राज्यातील पंचायत समित्यापैकी नाशिक पंचायत समितीला प्रथम क्रमांक तर चांदवड पंचायत समितीला उल्लेखनीय कामगिरीसाठी ९ वा क्रमांक मिळाला आहे. मोडाळे ग्रामपंचायतीचे इगतपुरी तालुक्यात अभिनंदन सुरु आहे.