सुनिल बोडके, इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
रायगड मधील तळेय गावच्या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी असलेल्या मेटघर किल्ला ग्रामपंचायतच्या सुपल्याची मेट व इतर सात वाड्या यांचे पुनर्वसन करण्याच्या बाबत प्रांताधिकारी व तहसीलदार दिपक गिरासे यांच्या मार्फत रहिवाशांमध्ये चर्चा घडून आली आहे. यावेळी तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरण करावे का ? असं प्रांताधिकारी यांनी नागरिकांना विचारले. आज पर्यंत आम्ही सुरक्षित आहोत, आमची शेती इथे आहे. अजून तरी आम्हाला काही धोका निर्माण झाला नाही. प्रसार माध्याम चुकीच्या बातम्या दाखवत आहे. अजून तरी पुनर्वसन करण्याची गरज नसल्याचे भिकन बदादे, संतोष आचारी, पोलीस पाटील किसन झोले यांनी चर्चेत सांगितले.
अजून तरी सुपल्याच्यामेटला धोका नसून आमची शेती, गुरे, वासरे, इथेच आहे, तुम्ही आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात कुठेही जरी नेले तरी आम्हाला दररोज इथेच लागेल. आमचं सर्वच इथे आहे. ब्रम्हगिरीला भेट देणाऱ्या भाविकांमुळे आम्हाला रोजगार मिळतो. आमचा बारा महिने रोजगार बुडेल. पूर्वजांपासून आम्ही इथेच राहतो, आम्हाला काही त्रास नाही. प्रसार माध्यमातुन सुपल्याच्या मेट संदर्भात ब्रम्हगिरी वरून दगड पडल्याच्या बातम्या येत आहे. दगड पडला खरा परंतु तो दगड पुढच्या बाजूने पडला. सुपल्याच्या मेटचे आणि त्याचे अंतर खूप लांब आहे. आज पर्यंत सुपल्याच्या मेट मध्ये कुठलाही दगड पडलेला नाही. आम्हाला आता तरी पुनर्वसन करण्याची गरज नाही, इथे ब्रम्हगिरीकडे जे भाविक येतात त्यांच्या मुळे येथील नागरिकांना रोजगार मिळत आहे अशा भावना मेटघर किल्ला ग्रामपंचायतचे सरपंच जगन झोले यांनी व्यक्त केली.
यावर यापुढे या भागात उत्खननावर प्रशासन लक्ष ठेऊन आहे. तुमचे योग्य जागी व तुमची शेती व व्यवसाय या बाबत योग्य तो विचार करून तसेच रोजगाराच्या साधनेवर कुठलीही गदा येणार नाही. याचा विचार करून पुनर्वसन होईल याची शाश्वती प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी दिली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ब्रम्हगिरीचे सीमांकन करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. थोड्याच दिवसात किल्ले ब्रह्मगिरीच्या सीमा निश्चित होतील असे ते म्हणाले.
यावेळी तहसीलदार यांनी अतिवृष्टीमुळे या भागात काही अनुचित प्रकार घडला तर पोलीस पाटील, सरपंच व ग्रामस्थ यांनी तात्काळ संपर्क करावा असे आवाहन केले. यावेळी प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दिपक गिरासे, पोलीस निरीक्षक रणदिवे, सहायक गटविकास अधिकारी एस. जी. पाठक, विस्ताराधिकारी बी. एस. पवार, मंडळ अधिकारी हेमंत कुलकर्णी, तलाठी जोशी, ग्रामसेवक विलास पवार, सरपंच जगन झोले, भिकन बदादे, शंकर बदादे,हिरामण जाधव, हरी झोले, विष्णू बदादे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.