
विठोबा दिवटे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
२० वर्ष घोटीच्या बाजार समितीत भाजीपाला मार्केटमध्ये हमाली करणाऱ्या तुकाराम भागूजी कोकणे रा. आडवण ह्या दुर्दैवी बापावर आज आभाळ कोसळले. त्यांचा एकुलता एक मुलगा नामदेव याचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तुकाराम कोकणे यांनी हमाली करून प्रपंचाचा गाडा हाकला. अन मग मुलगा हाताखाली आल्यावर शरीर थकल्याने हमाली बंद केली. चार जनावरे घेऊन दुधाचा धंदा करत कुटुंब सांभाळले. अशातच एकुलता एक मुलगा नामदेव जेमतेम शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी शोधू लागला. मात्र प्रचंड स्पर्धा अन वशील्याचा युग ह्यामध्ये नामदेव सारख्या वाऱ्यावरच्या तरुणाला कसली आलीय नोकरी ? मग नामदेवने आपली आवड जोपासली अन ग्राफिक्स क्षेत्रात रस अन करिअर करण्याचा निर्णय घेतला. मात्र घोटीसारख्या व्यापारी पेठेत व्यवसाय, त्यासाठी गाळा, जागा मिळणं मोठं दुरापास्त काम. मग अशातच वयाच्या २० व्या वर्षीच नामदेवाच लग्न झालं.
नामदेव कामाची संधी शोधत असतांना कै. पुंजाबाबा गोवर्धने फाऊंडेशनचे संचालक प्रशांत गोवर्धने यांनी केलेल्या संकल्पानुसार घोटी येथे सामाजिक काम म्हणून ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू लोकांसाठी मेडिकल वस्तूअल्प दराने भाड्याने देण्यासाठी येथे गाळा घेऊन ऑफिसचा शुभारंभ केला. त्यांना हे सांभाळण्यासाठी एका होतकरू तरुणाची गरज होती. ह्याचवेळी हा नामदेव त्यांच्या संपर्कात आला. नामदेवाने हे ऑफिस सांभाळायची जबाबदारी घेऊन स्वतःचा माऊली ग्राफिक्स ह्या नावाने व्यवसाय सुरु केला. हळूहळू आपल्या कुटुंबाला हातभार लावला जात होता. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून त्याने अनेक माणसे जोडली. १४ ऑगस्टला आपल्या दुकानाच्या वर्धापनदिनी आणि आपल्या १ वर्षांच्या जुई नावाच्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा करत असतानाच रात्री वयाच्या २२ व्या वर्षी नामदेवला अचानक हृदय विकाराचा तीव्र झटका आला. तात्काळ दवाखान्यात हलवले गेले मात्र नामदेव वाचू शकला नाही. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.