व्हिटीसी ते साकुर पर्यंतच्या समृद्धी महामार्गामुळे विस्थापन आणि निर्माण होणाऱ्या गंभीर प्रश्नांचे काय ?

लेखन : भास्कर सोनवणे, संपादक

नुकतीच समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या व्हिटीसी फाटा ते साकुर येथील कवडदरा फाटा पर्यंतच्या १६ किमी रस्त्यासाठी शासनाची अधिसूचना प्रसिद्ध झाली. यासाठी वाडीवऱ्हे, गोंदे दुमाला, बेलगाव कुऱ्हे, कुऱ्हेगाव, नांदूरवैद्य ( अस्वली स्टेशन ), नांदगाव बुद्रुक, साकुर ह्या गावांतील शेतकऱ्यांच्या काही जमिनीचे संपादन होणार आहे. संबंधितांना याबाबत नियमाप्रमाणे मोबदला सुद्धा दिला जाईल. मात्र बेलगाव कुऱ्हे, अस्वली स्टेशन, साकुर ह्या गावांच्या रस्त्यांच्या बाजूला असणाऱ्या गोरगरीब आदिवासी नागरिकांना मात्र कायमचे विस्थापित व्हायला लागणार आहे. दोन तीन पिढ्यांपासून कच्ची पक्की घरे झोपड्या बांधून मोलमजुरी करणाऱ्या ह्या कुटुंबांचे कसे पुनर्वसन करणार हा मोठा यक्षप्रश्न आहे. यासह नागरिक, विद्यार्थी, पशुधन यांच्या सुरक्षिततेसाठी काय आणि कशी दक्षता घेऊन काम केले जाणार आहे याबाबत अनभिज्ञता आहे. यासह ब्रिटिशकालीन डेरेदार वटवृक्षाची बेसुमार कत्तल होणार असल्याने पर्यावरणवाद्यांना तोंड द्यावे लागणार आहे. होणारे जमीन संपादन जेवढे क्षेत्र पाहिजे तेवढेच होणार असल्याने आधीच कमी क्षेत्र असलेले शेतकरी धास्तावले आहेत. कारण संपादन झाल्यावर राहिलेल्या नाममात्र क्षेत्राचा काहीएक उपयोग होणार नसल्याने त्याचे करायचे काय असा खरा प्रश्न आहे. 

प्राथमिक माहितीनुसार २५० कोटी रुपयांचा हा समृद्धी महामार्गाला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. बांधकामावर प्रत्यक्ष खर्च १६२.७ कोटी रुपये होणार असून उर्वरित खर्च भूसंपादनासाठी होणार आहे. या रस्त्यावर ४ मोठे पुल तर ३ लहान पुल असणार आहेत. ३७ पाईप मोऱ्या असून दोन मोठे आणि १५ लहान चौक असणार आहेत. या रस्त्यासाठी ४०.७३ हेक्टर जमीनीची गरज असून पैकी २३.१३ हेक्टर जमीन उपलब्ध असून १७.६० हेक्टर जमीन अधिग्रहीत होणार आहे. या रस्त्यामुळे घोटी-सिन्नर, नाशिक-मुंबई तसेच समृद्धी महामार्ग हे तीन महामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत.

व्हिटीसी फाट्यापासून आजूबाजूला असणारे ब्रिटिशकालीन वडांचे डेरेदार वृक्षांची कत्तल अटळ आहे. बेलगाव कुऱ्हे येथे रस्त्यात कांडेकर आणि देवकर यांच्या घराजवळून गावात प्रवेश करायला रस्ता आहे. बेलगाव कुऱ्हे ह्या गावाची ९५ टक्के शेतजमीन १९३८ साली लष्करासाठी संपादित झालेली असल्याने जगण्यासाठी येथील नागरिक पशुपालन आणि दुग्धव्यवसाय करतात. त्यामुळे प्रस्तावित रस्त्यावर सतत गुरांचे वास्तव्य असते. पुढे गेल्यावर महत्वपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र, १० पर्यंतचे जनता विद्यालय, एनडीसीसी बँक, तलाठी कार्यालय, सोसायटी कार्यालय असल्याने मोठ्या प्रमाणावर वर्दळ यासह नागरिकांची आणि जनावरांची सुद्धा सतत वर्दळ असते. त्यानुसार ह्या सर्व भागाजवळ सुरक्षिततेसाठी पुलाची आत्यंतिक आवश्यकता आहे. कांडेकर यांचे घर ते अस्वली रेल्वे स्टेशन पर्यंत उड्डाण पूल निर्मित केला तर शेकडो कुटुंबे विस्थापित होण्यापासून वाचायला मदत होऊ शकते.

अस्वली स्टेशनजवळ अनेक दशकांपासून झोपड्या बांधून अनेक गरीब आदिवासी कुटुंबे वस्ती करून राहत आहेत. ह्या भागाला अस्वलीची ठाकूरवाडी असे संबोधले जाते. अस्वली स्टेशन सोडल्यावर पुढे अशीच एक गरिबांची वस्ती आहे. यासह अस्वली स्टेशन येथील अनेकांना फटका बसणार आहे. साकुर गावाजवळील २ आदिवासी वस्त्यांना सुद्धा प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. याही भागात जनजीवन आणि वर्दळ असल्याने उड्डाण पूल निर्मित केल्यास अनेक कुटुंबे वाचतील. संपादन झालेच तर ह्या सर्वांचे पुनर्वसन कुठे करणार ? ह्यामुळे नागरिक चिंतेत सापडले आहेत.

अस्वली गावातील अंजनीनाथ महाराज समाधी मंदिर आणि दारणा धरण भागातील रस्त्यावर महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असणारा आश्रम, जलविद्युत प्रकल्प आहे. ह्या भागातून सुद्धा उड्डाण पूल अत्यावश्यक आहे. जेणेकरून कमीतकमी नुकसान होईल आणि नागरिकही आनंदी राहतील. एकंदरीत सर्व मार्गावरील वळणदार रस्त्यांना सुद्धा सरळ करण्यासाठी यानिमित्ताने शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.

व्हिटीसी फाटा ते दारणा धरणाच्या जवळ माजी सभापती आनंदराव सहाणे ह्यांच्या घरापर्यंत ब्रिटिश काळात लावलेली डेरेदार वडाची झाडे आहेत. ह्या रस्त्याच्या कामांमुळे ह्या वनसंपत्तीची बेसुमार कत्तल होणार असल्याने निसर्ग धोक्यात येणार आहे. ही झाडे वाचवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कसा वापर होईल ह्याकडे सुद्धा कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे ठरते.

जमीन संपादन करतांना जितके क्षेत्र पाहिजे तितकेच संपादन होणार आहे. त्यामुळे अनेक अनेक शेतकऱ्यांकडे अत्यल्प आणि काही कामाला न येणाऱ्या जमिनीचे छोटे तुकडे शिल्लक राहतील. परिणामी ही जमीन तशीच पडून राहिल्याने शेतकऱ्यांना फारसा उपयोग होणार नाही. शासनाने अत्यल्प जमीन शिल्लक राहत असेल अशा शेतकऱ्यांकडून पूर्णच क्षेत्र संपादन करून तसा मोबदला दिल्यास अनेक प्रश्न सुटायला मदत होणार आहे.

प्रस्तावित रस्त्यामुळे कायमचे रस्त्यावर येणाऱ्या लोकांसाठी शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष घालून त्यांना न्याय द्यावा. अत्यल्प उरणारे क्षेत्र सुद्धा संपादित करावे. नागरिकांच्या सुरक्षितेसाठी उड्डाणपूल, चौक वगैरे निर्मित करावे. कमीतकमी नुकसान होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. लोकांशी वेळोवेळी संवाद साधून प्रश्न आणि त्यावरील उपाय ह्यावर साधकबाधक आणि सर्वसमावेशक चर्चा व्हावी. वृक्ष संपदा वाचवावी. असे अपेक्षित आहे. ह्या रस्त्यामुळे विकासात भर पडत असेल तर त्यांचे स्वागतच.. मात्र ह्यामुळे ह्या भागाला भकासपणा येऊ नये ह्याची दक्षता घ्यावी. 

संबंधित बातमी खालील लिंकवर क्लिक करून वाचा

https://igatpurinama.in/archives/3659

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!