दरडी, भूस्सखलन, विद्युत खांब, विद्युतवाहक तारा कोसळल्याने पुन्हा विद्युत पुरवठा खंडित
तुकाराम रोकडे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसासह संतातधारेने देवगांव परिसरातील गाव, वाडे- पाड्यांवर पावसाने दाणादाण उडवली आहे. देवगांव येथे काही तासांपूर्वी सुरळीत करण्यात आलेला विद्युत पुरवठा पुन्हा विद्युतवाहक खांब व तारा तुटल्याने खंडित झाला आहे. पावसामुळे देवगांव परिसरात ठिकठिकाणी पावसामुळे दरड कोसळणे, भूस्सखलन होणे, नदी- नाले, ओहोळांना पूरपरिस्थिती उदभवून परिसर जलमय झाला आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले असून श्रीघाट – सावरपाडा येथे दरड व भूस्सखलन होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागात तुफान पावसाने कहर केला असून तीन दिवसांपासून संततधार आणि धोधो पडणाऱ्या पावसामुळे सर्वत्र त्रेधातिरपीट उडाली आहे. तर देवगांव येथील शासकीय कन्या आश्रमशाळेची सरंक्षण भिंत विद्युतवाहक खांबावर कोसळून खांब व विद्युत वाहकतारा तुटल्या. त्यामुळे सुरळीत झालेला विद्युत पुरवठा पुन्हा एकदा खंडित झाला असल्याने देवगांवमध्ये काळोख दाटला आहे. तसेच ठिकठिकाणी तारा तुटल्याचे निदर्शनास आले आहे. सकाळी खांब पडलेल्या रस्त्यामध्ये माणसांची वर्दळ नसल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.
देवगांवसह वावी हर्ष, श्रीघाट, टाके देवगाव, येल्याची मेट, चंद्राची मेट, आव्हाटे, डहाळेवाडी, टाकेहर्ष आदी परिसरात मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पाच ते सहा दिवसांपासून रात्रंदिवस सतत पाऊस कोसळत असल्यामुळे आवणा-आवणांमध्ये पाणी साठून देवगांव परिसर जलमय झाला आहे. मुसळधार पावसासह सतंतधार सुरू असल्याने घरांच्या छपरातून पाणी झिपरत असल्याने बहुतेक नागरिकांच्या घरांमध्ये ओलावा निर्माण झाला आहे.
देवगांव – श्रीघाट- सावरपाडा मार्गावर दरड कोसळली
देवगांव- श्रीघाट – सावरपाडा मार्गावर भूस्सखलन होऊन दरड कोसळली. गुरुवारी सकाळी श्रीघाट- सावरपाडा येथे मोरीच्या वळणावर रस्त्याच्या मध्यभागी मोठी दरड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सूर्यमाळ घाट, श्रीघाट वाहतुकीस धोकादायक बनत चालला आहे. त्यातच या मार्गाला नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. गुरूवारी पावसामुळे दरडीचा मोठा भाग रस्त्यावर आल्याने वाहतूकीची कोंडी होऊन वाहतूक ठप्प झाली.
देवगांव – खोडाळा- सूर्यमाळ या मार्गांवर दरवर्षी अशा घटना घडत असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग कायमस्वरूपी उपाययोजना करत नसल्याने जनतेत नाराजी आहे. या घाटांची दरवर्षी देखभाल केली जावी आणि प्रवाशावर दुर्दैवी प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी. अशी मागणी होत आहे.
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा धुडगूस सुरू असल्याने नदी, नाले, ओहळामुळे पावसाचे पाणी जमिनीत झिरपून जमिनीचे भुस्सखलन होऊन दरड कोसळण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. गुरूवारी श्रीघाट येथे दरड कोसळल्याने त्र्यंबकेश्वर- देवगांव -वाडा वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग बंद पडून चाळीस ते पन्नास गावांचा संपर्क तुटला.
दरम्यान, देवगांव- खोडाळा- वाडा मार्गावर श्रीघाट येथे कोसळल्या दरडीने पूर्ण रस्ता व्यापला असल्यामुळे दुचाकीसुद्धा जाण्यासाठी मार्ग उरलेला नाही. रस्त्याच्या कडेला सुमारे १०० फुटांहून अधिक उंचीवर दरी असल्याने कारणाने मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद झाली आहे. परिणामी शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक, रुग्ण, चाकरमानी, भाविकांना याचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, या मार्गावरून त्र्यंबकेश्वर, नाशिक, वणी आणि शिर्डी या तीर्थक्षेत्रांसह ठाणे, भिवंडी, पालघर, औरंगाबाद आणि नंदुरबारकडे जाणारी बस सेवा बंद झाली आहे. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे; तर त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी भाविकांचा हिरमोड झाला आहे. तसेच नाशिक, वणी आणि शिर्डी या तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या नागरिकांना जाणे जिकिरीचे झाले आहे.
मुसळधार पावसाने गाळवाडी येथे समाजमंदिर कोसळले
टाकेदेवगाव परिसरातील गाळवाडी येथील समाजमंदिर अतिवृष्टीमुळे कोसळले. समाज मंदिराचे प्रचंड नुकसान झाले असून समाजमंदिराचे छप्पर जमीनदोस्त होऊन कौले फुटल्यामूळे नुकसान झाली आहे. टाके देवगाव परिसरातील ५० ते ६० लोकवस्ती असलेल्या गाळवाडीत गेल्या 40 वर्षांपूर्वी बांधकाम केलेले समाजवट्टा होता. लोकसहकार्यातून ऊन, वारा, पाऊसाच्या बचावासाठी नागरिकांनी समाज वट्ट्यावर हजार ते पंधराशे कौलांची व्यवस्था करून छप्पर टाकले होते. मात्र, टाकेदेवगाव परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे समाजमंदिराचे छप्पर पडून मोठे नुकसान झाले आहे.
देवगांवसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी होऊन परिसर जलमय झाले आहेत. वारा वादळ व मुसळधार पाऊस यामुळे गाळवाडी येथील समाजमंदिराची पडझड होऊन कौलांचे नुकसान झाले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते शिवाजी वाक यांनी टाकेदेवगाव ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांस सदर घटनेचा तपशील कळविला असून पडझड झालेल्या समाजमंदिराचा पंचनामा करावा अशी माहिती शिवाजी वाक यांनी दिली.
प्राथमिक शाळेच्या शौचालयाची भिंत पडली
देवगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सौचालयाची भिंत मुसळधार पावसाच्या तीव्रतेने पडली. रात्रीपासून पावसाची सतंतधार सुरू असून सकाळी सौचालयाची भिंत पडली. सुदैवाने शाळा सुरू नसल्यामुळे जीवितहानी टळली. पावसाचे पाणी शौचालयाच्या भिंतीत झिरपून वादळ वाऱ्याच्या तडाख्याने कोसळली.
-त्र्यंबकेश्वर, मोखाडा सीमानजीक पावसाचा कहर सुरू असून सकाळ पासून सर्वत्र त्रेधातिरपीट उडाली आहे. तुफान पावसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागले असून, ठीक ठिकाणी दरड कोसळुन मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते वाहतूक बंद पडले तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
जव्हार सेलवास महामार्गवर दरड कळल्यामुळे काही तास वाहतूक ठप्प झाली होती, तर जव्हार पालघर महामार्गावर शिवनेरी ढाब्याच्या पुढे रस्त्यावर झाड पडून काही तास वाहतूक ठप्प झाली होती, झाड सोबत मुख्य विजवाहिनी सुद्धा पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता, सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. चांभारशेत येथील १५ शेतकरी चांभारशेत नदीला पूर आल्यामुळे काही तास डोंगरावरच अडकले होते, पाणी ओसरल्यावर गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात आले.
जमसार, झाप, तारेचाखांब, डेंगाचीमेट आदी ठिकाणी मोठं मोठे झाड रस्त्यात पडल्यामुळे काही तास मार्गक्रमण बंद होते, आपत्कालीन विभागाने तात्काळ झाडे बाजूला करून रस्ते पूर्ववत केले आहेत. चोथ्याचीवाडी येथील पाथर्डी रोडवरील मोरी पूर्णपणे वाहून घेल्यामुळे चारचाकी वाहनांचा संपर्क तुटला असून तेथील शेकडो घरे जव्हारच्या संपर्कक्षेत्राच्या बाहेर झाली आहेत. तर काही ठिकाणी कुडा मातीच्या घरांना नुकसान झाले आहे.