इगतपुरी महामार्गावर अवैध धंद्यांचा सुळसुळाट

पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल करणारे ठाण्याचे पोलीस अधीक्षक आणि अवैध व्यावसायिकांवर कारवाई करा

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

राज्यात विविध महामार्ग / टोलनाका परिसरात सुरू असलेल्या काटा नामक व काळापिवळा जुगार आदी अवैध व्यवसायाची बातमी संकलन करणाऱ्या पत्रकारावर कसारा पोलिसांकडून खोटे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्याने पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त केला. गुन्हेगारांना पाठीशी घालून खोटा गुन्हा दाखल करणारे ठाणे पोलीस अधीक्षक आणि संबंधित गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करावी, खोटा गुन्हा मागे घ्यावा असे निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, अनेक राष्ट्रीय, राज्य महामार्गावरील हॉटेल, ढाबा व टोलनाका परिसरात काटा नामक अवैध धंदा मोठ्या प्रमाणावर चालवला जात आहे. हा प्रत्येक अवैध धंदा उत्तर भारतीय गुंड प्रवृत्तीच्या गुंडाकडुन केला जातो. ह्यामधून टँकरमधुन काळे तेल, डांबर, विविध प्रकारचे केमिकल, लोखंडाच्या सळ्या आदी साहित्य काढले जाते. संबंधित वाहन चालकांच्या संमतीने वाहतुक करणाऱ्या ट्रेलरमधुन सर्रासपणे दिवसा ढवळ्या लोखंडी सळ्या उतरवण्याचे काम चोरीने सुरु असते. स्टीलच्या मोठमोठ्या कंपन्यामधुन लाखो टन लोखंडी सळ्याचे ट्रक मुंबईच्या दिशेने जात असतात. मात्र ट्रेलर चालक मध्येच काही क्विंटल लोखंडी सळ्या अशा अवैध धंद्यावाल्यांना विकत असल्याने याचा फटका स्टील उत्पादन कंपन्यांनाही बसत असतो. अनेक टोलनाक्या परिसरात काळा पिवळा नामक जुगार चालविला जात असुन या जुगाराच्या माध्यमातुन वाहन चालकांना लुटण्याचा प्रकार सुरु आहे.

नाशिक जिल्ह्यातही नाशिक ते कसारा महामार्गा दरम्यान आजही असे अवैध धंदे सुरू आहेत. याबाबत बातमी संकलनासाठी गेलेल्या पत्रकारांना या अवैधधंदे चालकांकडुन लुटमार किंवा खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असते. असा गंभीर इगतपुरीतील मुंबई आग्रा महामार्गावरील केपीजी कॉलेजच्या समोर असलेल्या राठी पेट्रोल पंपाशेजारील हॉटेल साई ढाब्यावर घडला आहे. या ढाब्यावर रात्रीच्या वेळी अवैध रीतीने ट्रेलरमधुन लोखंडी सळ्या सर्रासपणे उतरविल्या जात असल्याची गुप्त माहिती समजल्यावर वेध न्युजचे पत्रकार सतीश पुरोहित ११ जुन २०२१ ह्या दिवशी रात्री बातमी संकलनासाठी गेले. त्यावेळी येथील अवैधधंदा चालवणारा भंगारवाला अब्दुल रैफ खुशमतअली अन्सारी याने त्यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. श्री. पुरोहित हे रात्रीचा वेळ असल्याने जीवावर बेतू नये म्हणून घराकडे निघून गेले.

यानंतर आपले पितळ उघडे पडु नये यासाठी पत्रकार सतीश पुरोहित यांच्यावर लुटमार केल्याचा खोटा गुन्हा थेट ठाणे येथील पोलीस अधिक्षकांकडे करून कसारा पोलीस ठाण्यात सतीश पुरोहित यांच्या विरोधात लुटमारीचा खोटा गुन्हा दाखल केला. अन्सारी याच्यावर अनेक पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असुन याबाबत चौकशी होणे अत्यावश्यक आहे. खोटा गुन्हा दाखल करणारा भंगारवाला अन्सारी याची सखोल चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी. हे गुन्हे प्रचंड फोफावले असून यांना आशीर्वाद कोणाचा ? असा प्रश्न उपस्थित होत असल्याने पत्रकारांची सुरक्षा वाऱ्यावर आली आहे.

याचप्रमाणे अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या ठाणे जिल्हा पोलीस अधिक्षकांचा पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध करत आहोत. कुठलीही शहानिशा न करता निर्दोष पत्रकारांवर गुन्हे दाखल करणाऱ्या बेजबाबदार पोलीस अधीक्षकाची चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने वरील प्रकरणी तातडीने चौकशी करून पत्रकार सतीश पुरोहित यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्यावा. संबंधित अवैध व्यवसाय करणाऱ्यांना कायदा दाखवावा. ठाणे पोलीस अधीक्षक यांची संपत्तीची चौकशी करून कारवाई करावी. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी ह्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत कार्यवाही न झाल्यास राज्यातील पत्रकार बांधव लोकशाही मार्गाने राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री,विरोधी पक्षनेते, गृहमंत्री, खासदार, आमदार, पोलीस अधीक्षक नाशिक, पोलीस ठाणे इगतपुरी यांना पाठवण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इगतपुरी तालुकाध्यक्ष पोपटराव गवांदे, राजेंद्र नेटावटे, वाल्मीक गवांदे, भास्कर सोनवणे, दीपक भदाणे, गोपाळ शिंदे, राजु देवळेकर, गणेश घाटकर, सतीश पुरोहित, ओंकार गवांदे, विकास काजळे, संदीप कोतकर, शैलेश पुरोहित, सुमित बोधक, सुनिल पहाडिया, राहुल सुराणा, सुनिल तोकडे, एकनाथ शिंदे, शरद धोंगडे उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!