इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
नासिक येथील वरिष्ठ स्तर दुसरे सह दिवाणी न्यायाधीश यांनी दिवाणी दाव्याचे कामकाज व्हर्च्युअल, व्हिडिओ कॉन्फरन्स माध्यमाद्वारे आजपासून सुरू केलेले आहे. त्यानुसार कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वरिष्ठ वकिलांनी प्रत्यक्ष कोर्टात न जाता त्यांच्या घरातील कार्यालयातून व्हिडीओ माध्यमाद्वारे तोंडी युक्तिवाद केला. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर नाशिक यांनी व्हर्चुअल माध्यमाद्वारे शांतपणे युक्तीवाद वकिलांचा ऐकला. वरिष्ठ वकिलांनी ऑनलाइन दिवाणी कामकाजाचा हा पहिलाच प्रसंग आहे. ह्या प्रकारे कामकाजाचा प्रारंभ केल्यामुळे वकील आणि पक्षकारांनी स्वागत केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, नाशिकचे जिल्हा न्यायाधीश तथा ई कमिटी यांनी व्हर्च्युअल माध्यमाद्वारे नाशिक जिल्ह्यातील कोणत्याही कोर्टात तातडीच्या दाव्यात कामकाज करण्यासाठी ऑनलाइन लिंक उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यानुसार आज मंगळवारी एका दाव्यामध्ये प्रतिवादींसाठी वरिष्ठ वकील अनिल रामचंद्र देशपांडे यांनी त्यांच्या घरच्या कार्यालयातून एका अर्जावर ऑनलाइन व्हर्च्युअल पद्धतीने दिर्घ युक्तिवाद केला. त्यामुळे दाव्याचे कामकाज हे व्हर्च्युअल पद्धतीने सुरू झालेले आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये वरिष्ठ वकिलांनी व्हर्च्युअल माध्यमाद्वारे युक्तिवाद करण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.
आता येथून पुढे जे वरिष्ठ वकील आहेत त्यांना त्यांच्या घरच्या कार्यालयातून वेगवेगळ्या दाव्यांमध्ये युक्तिवाद करणे अतिशय सोयीचे होणार आहे. यामुळे जे तातडीचे दावे आहेत, त्यामध्ये पक्षकारांना न्याय मिळण्यास सोपे जाणार आहे. याचप्रकारे कोर्टाचे कामकाजही सुरू होईल अशी अपेक्षा सर्व वकिलांनी व्यक्त केली आहे. ह्या व्हर्चुअल कामकाजास वरिष्ठ वकील अ. रा. देशपांडे यांना मदत म्हणून त्यांचे सहाय्यक वकील प्रशांत जोशी, प्रितीश कंसारा, विक्रम साळवे यांनी साहाय्य केले. नाशिक जिल्ह्यातील सर्व न्यायालयात ह्या प्रकारचे कामकाज सुरू झाले असल्याने नागरिक आणि वकिलांचा बहुमोल वेळ वाचणार आहे.