अंबोलीत कोरोना योध्यांचा आमदारांच्या हस्ते सन्मान :
कोरोना काळात केलेल्या कामांचे आमदारांकडून कौतुक

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली येथे कोरोना महामारीत गावातील कोरोनाग्रस्त रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी प्रशासन आणि ग्रामपंचायतने योग्य नियोजन केले.  सर्वानुमते १० दिवस गाव बंदचा निर्णय घेऊन येथील वाढणाऱ्या रुग्णांची संख्या कमी करण्याचे काम झाले. गावातील कायदा व सुव्यवस्था राखून याकाळात वेळोवेळी पोलिसांच्या मदतीसाठी येथील पोलीस पाटील यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले. अशी सेवा करणाऱ्या कोरोना योध्यांचा सत्कार समारंभ अंबोलीत संपन्न झाला.

दुसऱ्या लाटेत तालुक्यात अंबोलीची रुग्णसंख्या ३०० वर जाऊन रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अंबोलीचे भूमिपुत्र अरुण मेढे पाटील, सरपंच पांडुरंग लचके, पोलीस पाटील ज्ञानेश्वर मेढे यांनी योग्य नियोजन केले. स्वतः गावात तळ ठोकून, घरोघरी फिरून, योग्य नियोजन करत एकही रुग्ण न दगावता अंबोली गावातील रुग्णसंख्या कमी करवून दाखवली. या कामात ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांनी महत्वपूर्ण सहकार्य  केले. म्हणून अरुण मेढे यांनी या कोरोना योध्यांचा योग्य तो सत्कार व्हावा म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले.

यावेळी आमदार हिरामण खोसकर, सभापती मोतीराम दिवे,  राष्ट्रवादीचे नेते अरुण मेढे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील, शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय मेढे, सरपंच पांडुरंग लचके, उपसरपंच गोकुळ मेढे, ॲड. भास्कर मेढे, तानाजी कड, ग्रामसेवक जितेंद्र नांद्रे, पोलीस पाटील ज्ञानेश्वर मेढे पाटील,  जयराम मोंढे, दत्तु जाधव, संजय तायडे, डॉ. घोरसडे, डॉ. भोई, आशा सेविका आदींसह अन्य कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार हिरामण खोसकर यांनी आरोग्य विभागाचे विशेष कौतुक केले. कोरोनाची दुसरी लाट भयंकर असताना आरोग्य विभागाने तितक्याच काळजीने काम करत लोकांचे प्राण वाचवले. घरोघरी जाऊन लोकांची विचारपूस केली. घरचे लोक जवळ येत नव्हते. परंतु आरोग्य विभाग तितकाच सजगतेने काम करत असल्यामुळे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत माझ्या सोबत संपूर्ण ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, तसेच आरोग्य कर्मचारी यांनी गाव पिंजून काढले. कोठे कोणाला ताप, सर्दी, ऑक्सिजन लेव्हल, प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारपूस केली. रुग्ण संख्या ३०० च्या आसपास असताना योग्य नियोजन करून आटोक्यात आणले. त्यामुळे आमच्याकडे एकही रुग्ण दगावला नाही. त्यामुळे आमचेकोविड योद्धे सत्काराला पात्र आहेत.
- अरुण मेढे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस