उपसरपंच अरुणा जाधव : कायापालट आणि विकासाचे शंभर नंबरी सोने
महिला पुरुषांपेक्षा कशातही कमी नाही. उलट अनेक वर्षांपासून एकही पुरुषाने न केलेला विकास एक महिला समर्थपणे करू शकते. निसर्गाने बहाल केलेल्या गुणधर्मांसह अंगी असणाऱ्या धाडसाचे रूपांतर जनसेवेत करण्याची किमया करणारे व्यक्तिमत्व म्हणजे अरुणा विकास जाधव. शेतीत आणि व्यवसायात यशस्वीपणे वाटचाल सुरू असतांना ग्रामविकासासाठी आपल्या शक्तीचा पुरेपूर वापर करून त्यांनी आपल्या वॉर्डाचा कायापालट केला आहे. साहस, संयम, अफाट कष्ट, जनसेवेचा वारसा आणि विकासाची ओढ ह्या पाच गुणांनी घोटी शहरातील नागरिकांचे जीवन उजळवण्यासाठी २४ तास सक्रिय असणाऱ्या अरुणा विकास जाधव ह्यांना ओळखलं जातं. राज्यातील मोठी बाजारपेठ असणाऱ्या घोटी ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदी आज अरुणा जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. हे सगळं यश नुसती विकासाची भुलभुलैया दाखवणारी स्वप्ने दाखवून मिळालं नाही. लोकांची महत्वपूर्ण स्वप्ने आणि कामे तर केलीच पण माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या ग्रामस्थांसह पती विकास जाधव आणि परिवाराने केलेलं सहकार्य मिळाल्याने यशाचा “अरुणोदय’ झाला अशी भावना नूतन उपसरपंच अरुणा जाधव यांनी व्यक्त केली.
घोटी ग्रामपालिका २०१९ च्या निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केल्यापासून ते आजवर त्यांनी केलेल्या कार्याची “विकास पावती” त्यांना जनतेने दिली आहे. त्यांच्या कौशल्याने ४० वर्षांपासून विकास कामांपासून कोसो दूर असणाऱ्या भागाला आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा विकासाची नवसंजीवनी मिळाली आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांवर प्रचंड निष्ठा, सुशील आणि संस्कारी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अरुणाताईंना विकासाची दूरदृष्टी आहे. विकास भाऊराव जाधव यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर आपल्याला लोकांच्या हृदयात असणाऱ्या ईश्वराची सेवा विकासकामांतून करायची आहे असे दोघांनी ठरवले होते. “अरुणा, तुझ्यात असामान्य कार्य करण्याची क्षमता आहे. जनकल्याणासाठी मी तुझ्या नेहमी सोबत आहे” असा शब्द विकास जाधव यांनी त्यांना दिला होता. त्यानुसार मागे वळून पाहताना अरुणा जाधव यांनी घरातील कौटुंबिक, व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडून लोकसेवेला वाहून घेतले. निव्वळ आपला वार्ड विकसित न करता अन्य भागातही विकासाची फळे त्यांच्यामुळे नागरिकांना लाभली. आगामी काळातही यापूर्वी न केलेली, धूळखात पडलेली विविध कामे पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा त्यांचा दृढ निश्चय आहे.
ग्रामपालिका निवडणुकीपूर्वीच संपूर्ण वॉर्डाच्या विकासाचा आराखडा अरुणा जाधव यांच्याकडे तयार होता. वॉर्डातील मतदार, त्यांचा सामाजिक प्रवर्ग, त्यांना नेमके काय काम हवे आहे ? शासकीय योजना कोणत्या हव्यात ? यापूर्वीची धूळखात पडलेली कामे पूर्ण कशी होतील ? इतिहास कसा बदलला जाईल ? शहराच्या इतर भागातील सुद्धा कामे कशी होतील ? यासाठी नागरिकांचे काय साहाय्य घ्यावे ? आदी अनेकानेक विषयांवर त्यांनी सूक्ष्म अभ्यास केला. निवडून आल्यानंतर लगेचच त्यावर अंमलबजावणी करून त्या अल्पावधीत लोकांच्या विश्वासाला पात्र ठरल्या. यासह सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन आपण तुमच्या कुटुंबातले घटक असल्याचा विश्वास निर्माण केला. वर्षानुवर्षे विकासापासून वंचित असणाऱ्या भागात बदल घडवून आणणे ही सोपी गोष्ट नव्हती. यासाठी काहींनी उभ्या केलेल्या कृत्रिम अडचणींवर दणकेबाज मात करावी लागली. जनतेचा कृपा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे मी संकटांच्या ढिगाऱ्यावर जाऊन संकटाला हरवून आले असे मत अरुणा जाधव व्यक्त करतात.
मनसे शहराध्यक्ष निलेश जोशी यांनी निवडणूक काळात भगिनीस्वरूप अरुणा जाधव यांच्यासोबत घरोघरी जाऊन प्रचार केला. विविध विचारांचे मतदार अरुणाताईंना सांगत की, तुम्ही दाखवत असलेली मोठमोठी स्वप्ने आम्हाला या आधीही दाखवली गेली आहेत. तुम्ही हे स्वप्न पूर्ण करता की नाही ही आम्हाला साशंकता आहे. यावेळी निलेश जोशी यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना स्वतः निलेश जोशी समजावत. अरुणाताई म्हणजे मीच..बहीण काय आणि मी काय एकच..माझ्यावर तुम्हाला विश्वास आहे ना ? मग माझ्या बहिणीवर पण विश्वास ठेवा. तुमच्या अपेक्षांना यापूर्वी अनेकांनी लावलेला सुरुंग विकास कामांच्या रूपाने खणून काढू असे यावेळी जोशी म्हणायचे. लोकांवर ह्याचा प्रभाव पडल्याने त्यांनी अरुणाताईंना निवडून दिले. मला सुद्धा या घटनेचा आणि विकासाचा साक्षीदार असल्याचा अभिमान वाटतो असे त्यांनी आवर्जून सांगितले.
घोटीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे दुखणे, सांडपाण्याचा निचरा, पथदिवे आणि वैयक्तिक लाभाच्या योजना लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोच झाल्या. कोरोना काळात गरजू नागरिकांपर्यंत जीवनावश्यक साहित्य पोहोचवले. अशी अनेक कामे करणारे लोकाभिमुख व्यक्तिमत्व अरुणा जाधव यांची घोटी ग्रामपालिकेच्या मानाच्या उपसरपंचपदी आज बिनविरोध निवड झाली. त्यांनी हे सगळं यश माझं एकटीचं नसून जेष्ठ नागरिक, माय बहिणी, युवा वर्ग यांना मी समर्पित करते अशी निर्मळ भावना व्यक्त केली. येणाऱ्या काळात अधिकाधिक कामे करून सर्वांच्या मनातला खरा विकास मी दाखवल्याशिवाय राहणार नाही असा निश्चय त्यांनी केला आहे. घोटी शहराच्या इतिहासात आज झालेला “अरुणोदय” “विकासाची” पावती देऊन गावकऱ्यांसाठी नवे पर्व निर्मित होवो या शुभेच्छा…!
घोटी शहरातील कायम दुर्लक्षित, वंचित असणाऱ्या वॉर्डाचा अनेक वर्षांचा अभ्यास मला आहे. ह्या वॉर्डाचा कायापालट करून अन्य वॉर्डांमध्येही विकासाची कामे होणे अत्यावश्यक होते. यासाठी काय करायला हवे ह्याचा मी अभ्यास केला. त्यानुसार आपल्या वॉर्डाला एका वैशिष्ट्यपूर्ण नेतृत्वाची गरज आहे. ह्या नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीकडे "व्हिजन" असले पाहिजे. आणि त्याचबरोबर "मिशन" सुद्धा. अरुणा वहिनींकडे ह्या दोन्ही गुणांसह लोकोपयोगी कामांचा निश्चय आहे. ह्या गुणांच्या जोरावर जनतेने भल्याभल्यांना घरी बसवून त्यांना निवडून दिले. निवडून आल्यावर एक क्षण गप्प न बसता त्यांनी विकासाची पावती जनतेकडून मिळवली. त्यांना मिळालेल्या उपसरपंच पदाच्या माध्यमातून घोटीमध्ये विकासाची गंगोत्री येईल हे निश्चित आहे.
- निलेश जोशी, घोटी शहराध्यक्ष मनसे