स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या

मार्गदर्शक : डॉ. कल्पना श्रीधर नागरे
संपर्क क्र. 9011720400
चिकित्सा आणि बाल मानसशास्त्रज्ञ
( एम. ए. बी. एड, एम. फील. सेट, पीएचडी )

विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य हा एक जगभर चर्चिला जाणारा गंभीर विषय आहे. विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक कामगिरी त्यांच्या मानसिक आरोग्यावर अवलंबून असते. मानसिक ताणाचा परिणाम केवळ त्यांच्या मानसिकआरोग्यावरच होत नाही तर त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक कामगिरीवर होत असतो. तसेच तो संपूर्ण समाजावर देखील होत असतो. कारण आजचा विद्यार्थी हा उद्याचा  जबाबदार नागरिक असतो. समाजाचे भविष्य असतो. आजचा विद्यार्थी उद्याचा शिक्षक, अभियंता, डॉक्टर, परिचारिका यासारख्या विविध भूमिका घेऊन देशाचे भविष्य घडवत असतो.

गेल्या वर्षापासून संपूर्ण जगभर कोरोनाचा कहर पसरला आहे. कोरोना आटोक्‍यात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी लॉकडाऊन करणे देखील अनिवार्य आहे. या प्रक्रियेत समाजातील सर्व घटकांना सहकार्य करावे लागत आहे. लॉकडाऊन प्रक्रियेत देशातील संपूर्ण शिक्षण संस्था देखील बंद पडल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा सतत पुढे ढकलण्यात येत आहे. विद्यार्थी मित्र निश्चित तारीख केव्हा येणार याची वाट पाहत आहे. परीक्षेचे अनिश्चित वेळापत्रक आणि सतत पुढे ढकलणाऱ्या परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांवर  मानसिक ताण येत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत. नुकत्याच पुण्यातील एका MPSC विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येच्या बातमीने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली. ह्या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक ताण का जाणवत आहे त्याचा घेतलेला एक हा आढावा..!

विद्यार्थ्यांमधील मानसिक तणावाची कारणे खालील प्रमाणे सांगता येतील

योग्य मार्गदर्शनाचा अभाव : स्पर्धा परीक्षेमध्ये मार्गदर्शनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दृष्टिकोनातून शालेय अभ्यासक्रमाकडे स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यांची योग्य तयारी करून घेणे गरजेचे आहे. परंतु क्वचित एखाद्या शाळेत किंवा महाविद्यालयातून असा प्रयत्न  केला जातो. अभ्यास कसा करावा याबद्दलही विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याने त्याची चिंता विद्यार्थ्यांच्या मनात घर करून राहते.

सतत येणारे अपयश : योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळे बरेच प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळत नसेल तर मुले निराश  आणि वैफल्यग्रस्त होतात.

नियोजनाचा अभाव : खरे तर वेळेचे नियोजन करणे हा स्पर्धा परीक्षेचा आत्मा आहे. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करता येत नाही. यासोबत अभ्यासाची सवय लावणेही गरजेचे असते. परंतु बरेच विद्यार्थी परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करतात आणि त्यामुळे कमी वेळेत अभ्यास कसा पूर्ण करायचा याची चिंता त्यांना भेडसावत असते.

अति अपेक्षा : स्वतःला स्वतःबद्दलच्या अपेक्षा असतातच. शिवाय आईवडील, नातेवाईक यांच्या देखील विद्यार्थ्यांकडून अपेक्षा असतात. त्यामुळे आपण अपेक्षा पूर्ण करू शकू की नाही याबद्दलचा विद्यार्थ्यांना मानसिक  दबाव जाणवत असतो.

वाढते वय आणि जबाबदारी : प्रत्येक व्यक्तीला कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी किमान चार पाच वर्ष जातात. या काळात उत्पन्नाचे साधन नसते आणि अनेक प्रयत्न करूनही सतत अपयश येत असेल तर व्यक्ती वैफल्य ग्रस्त होऊ शकते. याशिवाय उमेदीचे  इतके वर्ष वाया घालवले=आपले मित्र मैत्रिणी मात्र स्थिरस्थावर झाले आणिआपण मात्र मागे राहिलो ही भावना विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड  निर्माण करते.

अति आत्मविश्वास : बरेच विद्यार्थी आपली शालेय शैक्षणिक प्रगती गृहीत धरून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात येतात. मात्र स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक अभ्यासक्रम यात बरीच तफावत असते आणि नेमके हेच  विद्यार्थी समजून न घेता परीक्षा देतात आणि अपयश आल्याने निराश होतात.

आर्थिक कारणे : शिक्षण झाल्यानंतर जर स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी प्रदीर्घ काळ वाट पहावी लागली तर विद्यार्थ्यांना आर्थिक समस्या निर्माण होतात. रूम भाडे, जेवण खर्च, पुस्तकांचा खर्च यासाठी ओढाताण करावी लागते.  माणसाला कसलेही सोंग घेता येते परंतु पैशाचे सोंग घेता येत नाही. आर्थिक समस्या विद्यार्थ्यांना चिंताग्रस्त बनवतात.

सामाजिक दबाव : एखादा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे असे म्हटले तर लोकांचे प्रश्न त्याला त्रासदायक ठरू शकतात. कारण बरेच हितचिंतक स्वतः काही करत नसले तरी परंतु विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी मात्र करतात. त्यांच्याकडूंन सतत विचारले जाणारे  प्रश्न, टीका, टोमणे  विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण करतात.

असुरक्षितता : प्रशासकीय पदासाठी निघणाऱ्या मर्यादित जागा आणि परीक्षेची तयारी करणारे असंख्य विद्यार्थी असा काहीसा गोंधळ आहे. त्यामुळे प्रशासकीय पदासाठी असणारी उच्च कोटीची स्पर्धा  विद्यार्थ्यांच्या मनात असुरक्षितता आणि चिंता निर्माण करते. अपयशाची भीती, भविष्यकाळाची चिंता यासारख्या समस्यामुळे असुरक्षितता वाढते.

स्वतःचे मानसिक आरोग्य संतुलित कसे राखाल ?

विद्यार्थी मित्रांनो, दैनंदिन जीवनात उच्च कोटीची स्पर्धा असली तरीही या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी आपले मानसिक आरोग्य संतुलित राखणे गरजेचे आहे. तेच नसेल तर स्वतः ला टिकून ठेवणे अशक्य आहे. त्यासाठी खालील काही गोष्टी लक्षात घेता येईल..

संयम ठेवा : स्पर्धा परीक्षा जसे की MPSC आणि UPSC प्रदीर्घ काळ चालणाऱ्या परीक्षा आहे. या परीक्षांचा अभ्यासक्रम अत्यंत सखोल आणि विस्तृत असतो. विषयाची परिपूर्ण तयारी करण्यासाठी बराच कालावधी लागतो. हे लक्षात घ्या. पहिल्या प्रयत्नात यश मिळेलच असे नाही, त्यासाठी संयम राखून अभ्यास करा.

नियोजन करा : रोजच्या अभ्यासाचे नियोजन करणे आवश्यक आहे, जेणे करून रोज कोणता विषय वाचन करणार याचे वेळापत्रक तयार करता येईल. रोज अभ्यासाची वेळ आणि जागा निश्चित करा. जेणेकरून तुमचे अभ्यासवर लक्ष केंद्रित होईल. नियमित वाचनाची सवय करून घ्या.

स्वतःच्या क्षमता ओळखा :  प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न बघणे निश्चितच चांगले आहे. परंतु  त्यासाठी अभ्यास करणेही गरजेचे आहे. प्रत्येक  विद्यार्थ्यांची त्यासाठी योग्यता असेलच असे नाही. या दृष्टीने विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शारिरीक, मानसिक आणि बौद्धिक क्षमता ओळखून उद्दिष्टे ठरविणे आवश्यक आहे. क्षमता /कुवत नसेल तर प्रयत्न करूनही यश मिळणार नाही. म्हणुन त्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन घेतले तर फायदा होईल.

आर्थिक स्थैर्य : बरेच विद्यार्थी है पदवीधर असतात. मेडिकल अभियांत्रिकी क्षेत्रातून आलेले असतात. घरची आर्थिक परिस्थिती योग्य नसेल तर वेळेचे नियोजन करून तुम्ही पार्टटाइम व्यवसाय किंवा नोकरी देखील करू शकतात. जेणे करून आर्थिक ओढाताण जाणवणार नाही.

लवचिक आणि समायोजित दृष्टिकोन : एकाच गोष्टीवर अडून न राहता पर्यायी मार्गाचा स्वीकार करण्यास शिकले पाहिजे. खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी असा विचार न करता करिअर निर्मितीसाठी केवळ स्पर्धा परीक्षा एकमेव पर्याय नाही हे लक्षात घेऊन करियर निर्मितीचे विविध मार्ग शोधता येतील. एखाद्या क्षेत्रात सतत अपयश येत असेल तर मार्ग बदलून बघा यश नक्कीच मिळेल.

व्यायाम आणि ध्यान : व्यायाम आणि योगा केल्याने शारीरिक आणि मानसिक कमी होत असतो याशिवाय ध्यान धारणा केल्याने स्मरणशक्ती देखील वाढत असते. म्हणून रोज सकाळ संध्याकाळ किमान  तीस मिनिटे ध्यान धारणा करा.

कौटुंबिक आधार : घरातील व्यक्तींनी  आपल्या मुलांना आर्थिक आणि मानसिक पाठबळ देणे गरजेचे आहे. आर्थिक सहकार्य शक्य नसेल तरीही मानसिक आधार देणे गरजेचे आहे. आपल्या मुलांवर अपेक्षांचे ओझे न लादता त्यांना भावनिक आधार द्या, यामुळे मुलांना नैराश्य येणार नाही. त्याचबरोबर पालकांनी लक्षात घेतले पाहिजे की शैक्षणिक परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा यामध्ये बरीच तफावत असते. त्यामुळे परीक्षेत यश मिळवण्यासाठी थोडा वेळ लागेलच.  पालकांची सकारात्मक विचारसरणी मुलांना परीक्षेसाठी प्रोत्साहित तर करेल. शिवाय मुलांना नैराश्यातून बाहेर देखील काढू शकेल.

विद्यार्थी मित्रांनो स्वप्न बघणे निश्चितच चांगले आहे। त्यादृष्टीने प्रयत्न करणं देखील चांगले आहे. परंतु  स्पर्धा परीक्षा देत असताना स्वतःचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखणे देखील गरजेचे आहे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना आपल्या क्षमतांचा  विचार करा आणि त्यानुसार निश्चित उद्दिष्ट ठरवा. अपयश येत असेल तर मार्ग बदला स्पर्धा परीक्षांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघा.

एक गोष्ट लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षा तुमच्या करियर निवडीचा पहिला पर्याय आहे, असू शकतो. परंतु शेवटचा तर नक्कीच नाही. त्यासाठी करियर निर्मितीच्या विविध वाटा धुंडाळता येतील. सतत अपयश येत असेल तर मार्ग बदला यश तुमची वाट बघत असेल. आत्महत्या करणे हे काहीं समस्याचे उत्तर असू शकतं नाही. प्रत्येक वेळी सरकारवर अवलंबून न राहता पर्यायी मार्गाचा अवलंब करा. कारण वाढती लोकसंख्या विचारात घेता सरकार कोणतेही असो आपला मार्ग स्वतः निवडा.

वरील व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे

https://youtu.be/UvMTZJtJzEY

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!