जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन ‘सीएमपी’ प्रणालीने करावे : शिक्षक भारतीची मागणी

इगतपुरीनामा न्यूज (विशेष प्रतिनिधी) दि. ९ : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करून दरमहा वेतन सीएमपी प्रणालीद्वारे करण्यात यावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे व शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक वर्षापासून मुख्य प्रश्न प्रलंबित असुन मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदोन्नती बाबत आमदार कपिल पाटील यांनी स्वंतत्र पत्र दिले असून यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचे श्री म्हसकर यांनी शिष्टमंडळास सांगितले.
वेतन प्रणालीबाबत शिक्षक भारती पुर्ण सहकार्य करणार असल्याने या संदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन श्री पिंगळे यांनी दिले.
निमशिक्षकांची सेवा जेष्ठता शासन निर्णयानुसार सेवा पुस्तकात तातडीने नोंदवण्यात यावी,निवड श्रेणी प्रस्ताव मागवून निकाली काढावेत, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विषय निहाय पदवीधर शिक्षकांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने पदोन्नतीची कार्यवाही करावी.प्रत्येक तालुक्यातील शिक्षकांचे गोपनीय अहवाल छायांकित प्रत शिक्षकांना देण्यात यावी, सेवानिवृत्त शिक्षकांना पहिल्याच दिवशी सर्व आर्थिक लाभाचे धनादेश देऊन पेन्शन लागू करण्याचे नियोजन करावे,सेवानिवृत्त शिक्षकांची अनेक दिवसांपासूनची थकीत देयके त्वरित अदा करावी, वैद्यकीय बिले व इतर देयके त्वरित मिळावीत यासाठी निधीची शासनाकडे मागणी करण्यात यावी. शालेय पोषण आहार रक्कम विदयार्थी खात्याऐवजी शालेय स्तरावर वाटप करून सुलभ करावे. जिल्हा परिषदेमार्फत कोविड काळातील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक सुलभ सोप्या स्वाध्याय पुस्तिका पुरविण्यात याव्यात,मयत झालेल्या कोविड विमा प्रकरणांचा तातडीने निपटारा करून लाभ देण्यात यावा या मागण्या करण्यात आल्या.
पदोन्नतीसह निवड श्रेणीचे प्रस्ताव मागविण्यात आले असून लवकरच याबद्दल नियोजन करण्यात येणार असल्याचे श्री पिंगळे व श्री म्हसकर यांनी शिष्टमंडळास सकारात्मक चर्चेत सांगितले. या शिष्टमंडळात राज्य सरचिटणीस भरत शेलार, विभागीय अध्यक्ष राजेंद्र दिघे, केंद्रप्रमुख राज्य सरचिटणीस राजेंद्र नांदुरकर, जिल्हाध्यक्ष प्रकल्प पाटील, विभागीय संपर्कप्रमुख सतिश मांडवडे, राजेंद्र निरभवणे, दशरथ गोयेकर, दिलीप धांडे, जगदीश दळवी, सुनील गांगुर्डे, संजय देहाडे, रमेश खैरनार, अमोल अहिरे, संदीप देहाडे सहभागी होते.