हरिदास लोहकरे यांचा पाठपुरावा अन् खासदार गोडसे यांच्या प्रयत्नांनी होणार दर्जेदार रस्ता
इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
इगतपुरी तालुक्यातील मोठी पौराणिक परंपरा लाभलेल्या टाकेद ते धामणगाव ह्या महत्वपूर्ण रस्त्याला कोणी वाली नसल्याचे समोर आले आहे. ह्या रस्त्याच्या प्रचंड दुरावस्थेमुळे ह्या भागासह विविध गावांतील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांची शृंखला असे ह्या रस्त्याचे वैशिष्ठय असून हा रस्ता नेमका कोणत्या विभागाने दुरुस्त करावा असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेचा इगतपुरी उपविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींनी हा रस्ता आमच्या अखत्यारीत येत नसल्याचे स्पष्ट भूमिका घेतली आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी खासदारांच्या सूचनेनुसार हा रस्ता आमच्याकडे वर्ग करीत झाल्याचे सांगितले आहे. ह्यामुळे ह्या रस्त्याची दुरुस्ती अथवा नव्याने रस्ता नेमका कोणी करावा असा सवाल उपस्थित झाला आहे. हा रस्ता जिल्हा परिषदेकडे नसला तरी नागरिकांच्या प्रश्न सोडवणुकीसाठी ह्या भागातील जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांनी पुढाकार घेऊन खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
इगतपुरी तालुक्यात धार्मिक परंपरा आणि पर्यटन स्थळ असलेल्या परिचित असलेल्या सर्वतीर्थ टाकेद येथे भाविक व पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. हे गाव ह्या भागाची प्रमुख बाजारपेठ असून अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी जवळचा मार्ग आहे. ह्या सर्वांसाठी टाकेद ते धामणगाव हा रस्ता अतिशय महत्वाचा आहे. उत्तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध एसएमबीटी रुग्णालयात उपचारासाठी येणारे नागरिक ह्याच रस्त्याचा वापर करतात. मात्र ह्या रस्त्याला खड्ड्यांचे मोठे ग्रहण लागल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणावर चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाल्याचे दिसते.
ह्या रस्त्याची सुधारणा करावी अशी नागरिकांची मागणी असून जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांनी याबाबत चांगलाच पाठपुरावा केला. मात्र टाकेद ते धामणगाव हा रस्ता आमच्या उपविभागाच्या कार्यक्षेत्रात मोडत नसल्याचे स्पष्ट उत्तर इगतपुरीच्या जिल्हा परिषद उपविभागाचे उपअभियंता प्रवीण शिरसाठ यांनी दिले. यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कौस्तुभ पवार यांनीही हा रस्ता आमच्याकडे नसल्याचे स्पष्ट केले. या कारणांमुळे ह्या रस्त्याच्या कामाला मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असल्याचे हरिदास लोहकरे यांनी सांगितले. ह्या रस्त्याला कोणी वाली नसला तरी काम तर होणे अत्यावश्यक असून लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य असल्याचे लोहकरे म्हणाले. त्यानुसार त्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे पाठपुरावा करून टाकेद ते धामणगाव हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या विभागाकडे सोपवला आहे. ह्या रस्त्याला नवे रुपडे देण्यासाठी श्री. लोहकरे यांच्या पाठपुराव्याने आणि खासदार गोडसे यांच्या प्रयत्नांनी ह्या रस्त्याचे काम दिल्ली येथील कार्यालयात मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. काही दिवसातच ह्या रस्त्याचे गुणवत्तापूर्ण काम होणार असल्याचे हरिदास लोहकरे यांनी सांगितले. असे असले तरी नागरिकांना कोणतीही अडचण येऊ न देता ह्या रस्त्याचे सर्व खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांचे आभार मानले आहेत.
जिल्हा परिषद उपविभाग इगतपुरी ह्या कार्यालयाकडे टाकेद धामणगाव ह्या रस्त्याचा संबंध नाही. आमच्याकडे हा रस्ता नसल्याने देखभाल दुरुस्ती करण्यासाठी काहीही तरतूद करता येत नाही.
- प्रवीण शिरसाठ, उपअभियंता इ व द इगतपुरी
आमच्या विभागाकडील रस्त्यांच्या यादीत टाकेद धामणगाव हा रस्ता नाही. अन्य कोणत्या विभागाकडे हा रस्ता आहे हे सांगता येणार नाही. आमच्याकडील रस्त्यांबाबत आम्ही निर्णय घेतो. म्हणून ह्या रस्त्याबाबत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही.
- कौस्तुभ पवार, सार्वजनिक बांधकाम उपविभाग इगतपुरी
यापूर्वी हा रस्ता कोणाकडे असेल हे सांगता येणार नाही. मात्र खासदार हेमंत गोडसे यांच्या सूचनेनुसार हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत समाविष्ट केला आहे. रस्त्याच्या कामांबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
- राहुल लोणे, शाखा अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना
धामणगाव ते टाकेद रस्ता जिल्हा परिषदेकडील नाही. लोकप्रतिनिधी ह्या नात्याने सामान्य माणसाच्या समस्या दूर करणे गरजेचे आहे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेकडे हा रस्ता मंजुरीसाठी प्रस्तावित आहे. काम होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. काम मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. त्यामुळे प्रश्न मार्गी लागून समस्या सुटेल.
- हरिदास लोहकरे, जिल्हा परिषद सदस्य