“मॅग्मो प्रकाश” नावाचे वादळ काळाच्या पडद्याआड !

लेखन :- जी. पी. खैरनार, नाशिक

महाराष्ट्र राज्यात राजपत्रित वैद्यकीय अधिकारी यांना गट – ब मधून गट – “अ” श्रेणीत श्रेणीवर्धन करुन गट – अ श्रेणीचे वेतन मिळवून देणारे शिल्पकार तथा वैद्यकीय क्षेत्रातील महान तपस्वी डॉ. प्रकाश आहेर यांचे आज दुर्धर आजारपणामुळे दुःखद निधन झाले ही खूपच वेदनादायी व दुःख देणारी घटना आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी गावातील आहेर कुळातील डॉ. प्रकाश आहेर यांनी आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्र राज्यात शासकीय सेवेत कार्यरत शासकीय वैद्यकीय अधिकारी यांची वज्रमुठ बांधून शासकीय सेवेतील वैद्यकीय अधिकारी यांच्या न्याय हक्काचं व्यासपीठ म्हणून महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्रा असोसिएशन ऑफ गॅझेटेड मेडिकल ऑफिसर (मॅग्मो) संघटनेची स्थापना केली. वैद्यकीय अधिकारी यांना नॉन प्रैक्टिसिंग अलौन्सेस लागू करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करुन शासकीय सेवेत वैद्यकीय अधिकारी यांच्या हिताचे निर्णय शासन स्तरावरुन पदरात पाडून घेऊन वैद्यकीय अधिकारी संवर्गास न्याय हक्क मिळवून देण्याचे मोठे काम डॉ. प्रकाश आहेर साहेब यांनी केले आहे.
डॉ. प्रकाश आहेर यांनी शासकीय सेवेतुन नाशिक येथून जिल्हा क्षयरोग अधिकारी या पदावर कार्यरत असतांनाच मॅग्मो वेलफेयर संस्थेची स्थापना केली होती. मॅग्मो वेलफेअर संस्थेच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब घटकांना शासनाच्या विविध आरोग्य सेवा सुविधांचा लाभ मिळवून देण्याचे मोठे काम आदरणीय डॉ. प्रकाश आहेर यांनी केले होते.
डॉ.प्रकाश आहेर साहेब यांनी आरोग्य सेवेत कार्यरत आपल्या सहकारी मित्रांना सोबत घेऊन मॅग्मो प्रकाश गृहनिर्माण संस्था स्थापन करुन सर्व मित्रांना नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या उंटवडी येथे सर्वांना चांगली घरे उपलब्ध करुन सर्व जिवलग मित्रांची वज्रमुठ घट्ट विणुन ठेवली होती.
शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी यांना आर्थिक मदत तात्काळ उपलब्ध होण्यासाठी मॅग्मो पतसंस्थेची स्थापना केली होती. याच मॅग्मो पतसंस्थेच्या माध्यमातून शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांना तात्काळ आपत्कालीन वित्तीय सहाय्य तथा कर्ज उपलब्ध करुन दिले जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेतील उच्च पदावर आपल्या मुलांनी सेवा करावी अशी डॉ. प्रकाश आहेर यांची मनोमन इच्छा होती. डॉ. प्रकाश आहेर यांचे स्वप्न त्यांचे चिरंजीव नाशिक जिल्हा परिषदेत कार्यरत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांच्या रुपातून पूर्ण झाल्याने डॉ. प्रकाश आहेर साहेब यांना मनोमन आयुष्याचे सार्थक झाल्याचे जाणवत होते.
डॉ. प्रकाश आहेर साहेबांना दुर्धर आजाराने अकाली निधन झाल्याने त्यांच्या पत्नी, मुले, सुना व नातवंडे यांच्यासह त्यांच्या आप्तेष्टांना अतीव दुःख झाले आहे.
डॉ. प्रकाश आहेर साहेब यांच्या अकाली निधनाने नाशिक जिल्ह्यासह शासकीय आरोग्य सेवेतील यंत्रणेचे खूप मोठे नुकसान झाले आहे. उत्कृष्ट संघटन कौशल्य असलेले, सय्यमी, धुरंधर, अभ्यासु, उच्च शिक्षित मार्गदर्शक तथा महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागातील भीष्म पितामहास माझ्यासह महाराष्ट्र राज्यातील आरोग्य सेवेत कार्यरत अधिकारी कर्मचारी मुकले आहेत. डॉ. प्रकाश आहेर साहेब यांच्या दुःखद निधनाने महाराष्ट्र राज्यातील आरोग्य सेवेत प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांचा हक्काचा आधारवड हरपला आहे.
आदरणीय डॉ.प्रकाश आहेर साहेब यांच्या पवित्र स्मृतीस सदगती लाभो व त्यांच्या कुटुंबियांना हे अवघड दुःख पेलण्याची ईश्वर शक्ती देवो ही विनम्र प्रार्थना !

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!