इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ – इगतपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण असणाऱ्या साकुर परिसरातील सर्व गावे मागील तीन दिवसांपासून अंधाराच्या साम्राज्यात आहेत. विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध एसएमबीटी रुग्णालयात सुद्धा विजेअभावी अनेक अडचणींचा सामना सुरू आहे. तीन दिवसांपासून वीज मंडळाला नेमका फॉल्ट सापडत नसल्याचे ऐकिवात आले आहे. विजेच्या अभावामुळे ह्या भागातील सर्व व्यवहार ठप्प झाले असून ग्रामीण भागात वीज मंडळाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पाणी पुरवठा योजना, बँकिंग, आरोग्य आदींसह सिन्नर घोटी महामार्गावरील व्यवसाय धोक्यात आले आहेत. ह्या प्रकरणी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून वीजप्रवाह सुरळीत करावा. अन्यथा कोणत्याही क्षणी ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक होऊन आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते आत्माराम फोकणे यांनी दिला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून साकुर परिसरासह एसएमबीटी रुग्णालय ते धामणगाव पर्यंतच्या सर्व गावांत वीज गायब आहे. वीज कर्मचाऱ्यांकडून वीजपुरवठा लवकरच सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र नेमके काय चालले आहे याबाबत ह्या भागात अनभिज्ञता आहे. एसएमबीटी, कवडदरा, भरविर खुर्द, भरवीर बुद्रुक, धामणगाव, घोटी खुर्द, साकुर, निनावी, शेणीत, पिंपळगाव डुकरा, पिंपळगाव घाडगा ही सर्व गावे तीन दिवसांपासून अंधारात आहेत. विद्युत पुरवठा खंडित असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बँकेचे व्यवहार बंद पडल्याने मोठी गैरसोय होत आहे. विद्युत पुरवठा खंडित असल्याने पिठाच्या गिरण्या बंद आहेत. तसेच अनेक गावांचा पाणीपुरवठा देखील बंद आहे. पाणी उपलब्ध असतांनाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणावर परिणाम झाला आहे. त्यातच मागील तीन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने मोबाईल सुद्धा बंद पडले आहेत. विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहात आहे. याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आत्माराम फोकणे यांनी केली आहे. ग्रामस्थांच्या संतापाचा अतिरेक होऊन आक्रमक आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
■ गेल्या ३ दिवसांपासून आमच्या भागातील लोकांच्या सहनशीलतेचा अंत वीज मंडळ पहात आहे. वीज गायब असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. वीज मंडळाने अधिक अंत न पाहता युद्धपातळीवर काम करून वीजप्रवाह सुरळीत करावा. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल.
– आत्माराम फोकणे, सामाजिक कार्यकर्ते, घोटी खुर्द