इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
गरिबीच्या परिस्थितीचा सामना, शैक्षणिक जागृतीचा अभाव, रात्रंदिवस जगण्याची भ्रांत आणि वर्षानुवर्षाच्या मानसिकतेच्या दबावाखाली मोठीमोठी स्वप्ने पाहूनही ती अपूर्ण राहतात. मात्र ह्या सगळ्या अडचणींचा सामना करून आपल्या ध्येयसिद्धीची वाटचाल आणि आईवडिलांची स्वप्नपूर्ती करणारे गुणवंत सन्मानाला प्राप्त होतात. आपले आईवडील, शिक्षक, गांवकरी यांच्या मनांतील अपेक्षांपेक्षा उत्तुंग कामगिरी करणाऱ्या देवळे ता. इगतपुरी येथील ११ मौल्यवान रत्नांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. शालेय शिक्षण समिती आणि देवळे ग्रामस्थांकडून हा अनोखा सोहळा ७ जानेवारीला होणार आहे. गावातील ११ जणांनी आपल्या विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण समिती देवळे यांनी दिली आहे.
देवळे येथील डॉ. चंद्रकांत गेणू दालभगत यांनी आयआयटी खडगपूर येथे अनेक वर्ष संशोधन करून लोहयुक्त तांदळाच्या निर्मितीमध्ये मोठे योगदान दिले. त्यांचे मार्गदर्शक संशोधन देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी उपयुक्त ठरले आहे. देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार देऊन विशेष कौतुक केले. डॉ. सखाराम सनु उघडे यांनीही गरिबीचा सामना करून पीएचडी केली. गणपत बाबुराव तुपे हे प्रथितयश चार्टर्ड अकाउंटंट आहे. प्रकाश रघुनाथ तोकडे हे मुंबई पोलिसांत सेवा करतात. ॲड. अनिल रघुनाथ तोकडे, ॲड. विद्या अनिल तोकडे, ॲड. गोरख गंगाराम दालभगत, ॲड. संपदा प्रशांत उबाळे ह्या चौघांनी विधी क्षेत्रात प्राविण्य मिळवून उत्तम कार्य केले. प्रवीण प्रकाश दालभगत, लक्ष्मण दत्तात्रय भागडे, स्वाती अजय उबाळे यांनी पदवीधर होऊन आपल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवला. हे ११ जण देवळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकले आहेत. ह्या सर्वांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घेऊन आपल्या देवळे गावाचे नाव देशपातळीवर झळकावण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी ११ मौल्यवान रत्नांचा सन्मान सोहळा होणार आहे. ह्या सोहळ्यासाठी इगतपुरी तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आदींची उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम ७ जानेवारीला दुपारी ३ वाजता देवळे येथे होणार आहे. ह्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षण समितीचे अध्यक्ष दत्ता तोकडे, मुख्याध्यापक गांजवे, केंद्रप्रमुख पांडुरंग शिंदे, विशाल सोनवणे, ग्रामस्थ आणि शिक्षक यांनी केले आहे.