जागतिक पातळीवर शाश्वत मूल्यांचा प्रचार – प्रसारासाठीच्या प्रकल्पात इगतपुरी तालुक्यातील शिक्षकांचा समावेश

इगतपुरीनामा न्युज दि. 14: इको ट्रेनिंग सेंटर स्विडन, प्रादेशिक विद्या प्राधिकरण ( डाएट ) नाशिक, जिल्हा परिषद जळगांव आणि बांग्लादेश एलिमेंटरी इन्सिटीट्यूट तर्फे आयोजित भारत – बांग्लादेश टेलीकोलॅबोरेशन प्रोजेक्ट २०२१ मध्ये आपल्या इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिटोलीचे पदवीधर शिक्षक सिद्धार्थ सपकाळे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणीचे शिक्षक प्रदिप खैरनार यांनी सहभाग घेत प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला. तसेच दुसऱ्या एका टिममध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंबाळे येथील पदवीधर शिक्षिका वर्षा चौधरी यांनीही सहभाग घेतला .
युनो या आंतरराष्ट्रीय संघटनेने २०१५ मध्ये जागतिक पातळीवर शाश्वत विकासासाठी १७ ध्येये निश्चित करून २०३० पर्यंत पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केला आहे. त्या १७ ध्येयांपैकी भूक निर्मुलन, दारिद्रय निर्मुलन, क्वालिटी एज्युकेशन, चांगले आरोग्य, स्त्री पुरुष समानता, स्वच्छ पाणी, अन्न संरक्षण आदि ध्येयांविषयी चर्चा तथा मार्गदर्शन करण्यात आले. तसेच भारत आणि बांग्लादेश या दोन्ही देशातील सण, उत्सव, संस्कृती, आरोग्य, शिक्षण, भौगोलिक परिस्थिती,अन्न आदी विषयांवर विचारांची देवाणघेवाण झाली. त्यासाठी १७ सत्र प्रत्येकी ९० मिनिटांचा घेण्यात आला. Zooo app द्वारे विविध माहितींची PPT तसेच Video निर्मिती च्या साहाय्याने ऑनलाईन सत्र घेण्यात आली. भविष्यात मानवाच्या कल्याणासाठी शाश्वत मूल्यांच्या प्रचार-प्रसारासाठी विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहित करणार असल्याचा शिक्षकांचा मानस आहे. आंतरराष्ट्रीय प्रकल्पात सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.यात सिद्धार्थ सपकाळे आणि प्रदिप खैरनार यांच्या सोबत बांग्लादेशातून उपक्रमशिल शिक्षिका सुमित्रा चौधरी, तसेच जळगांव जिल्ह्यातुन रावसाहेब जगताप यांनी इतर देशातील शिक्षकांसह एकमेकांशी ऑनलाईन संवाद साधला. प्रकल्प यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय समन्वयक डायट नाशिकचे ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रा. योगेश सोनवणे तसेच जळगांव येथील प्रा.भरत शिरसाठ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!