कोरोनाचे नियम पायदळी ; आगामी काळ खडतर

भास्कर सोनवणे, पत्रकार

इगतपुरी तालुक्यात गेल्या काही आठवड्यांपासून कोरोना बाधितांची वाढती संख्या अतिशय चिंतेचा विषय ठरत आहे. नागरिकांचा बेजबाबदारपणा, प्रशासनाचे अपुरे बळ, जबाबदाऱ्यांपासून पळ आदी कारणांमुळे ही संख्या वाढते आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गोंदे दुमाला, वाडीवऱ्हे, इगतपुरी येथील औद्योगिक वसाहतीत नाशिकहून जाणारे येणारे कामगार बहुतांशी कोरोनाचा प्रसाद वाटप करीत असल्याची शंका आहे. ह्यावर कोणालाही तोडगा काढावा असे वाटत नाही. सर्रासपणे नियम पायदळी तुडवणाऱ्यांना कठोर शासन होत नाही. परिणामी आगामी काळ इगतपुरी तालुक्यासाठी अत्यंत खडतर ठरेल अशी दाट शक्यता आहे.
इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक गर्दीचे शहर म्हणून घोटी परिचित आहे. त्यानंतर इगतपुरी, गोंदे दुमाला, वाडीवऱ्हे, टाकेद बुद्रुक, साकुर फाटा असा गर्दी असणाऱ्या गावांचा क्रम आहे. मागील वर्षी सुद्धा कोरोनाचा उद्रेक होत असताना ह्या गावांमध्ये गर्दी मात्र कमी झाली नाही. या भागातले प्रशासन नागरिकांना सांगून सांगून थकले मात्र काही बदल मात्र झालाच नाही. गेल्या काही आठवड्यांपासून इगतपुरी तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येने सर्वांची चिंता वाढवली आहे. ग्रामपंचायती, आरोग्य यंत्रणा, महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा आपले काम करीत असल्या तरी नागरिकांच्या गर्दीचा उच्छाद वाढतोच आहे. म्हणूनच रुग्णसंख्या आता हाताबाहेर जाण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
तालुक्यात १३५ पेक्षा जास्त महसुली गावे आणि विविध संख्येने आदिवासी वाड्या पाड्या आहेत. यापैकी 90 टक्के ठिकाणी कोणताही नियम पाळला जात नाही. नागरिकांची बेजबाबदार गर्दी संक्रमण वाढवण्याला कारणीभूत ठरते आहे. कोणी बोलायला गेले तर हमरीतुमरीवर येण्याचेही प्रमाण वाढतच आहे. सर्वाधिक गर्दी असणाऱ्या घोटी शहरात कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय वाढल्याने अखेर ग्रामपालिकेला जनता कर्फ्युचा निर्णय घ्यावा लागला. लग्ने, दशक्रिया आणि सार्वजनिक कार्यक्रमांमुळे फैलाव झाला असल्याने पोलिसांनी निर्बंध कठोर केल्यामुळे संख्या बऱ्यापैकी कमी झाली.
विविध कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी शेकडो कामगार रोज नाशिकहून इगतपुरी, गोंदे दुमाला, वाडीवऱ्हे औद्योगिक वसाहतीत येत असतात. नाशिक शहर बाधित संख्येमुळे हॉटस्पॉट ठरले असूनही कंपन्यांमध्ये नियमांना उघडउघड हरताळ फासला जातोय. परिणामी कोरोनाचा प्रसाद जलदगतीने होण्यास चांगलाच हातभार लागत आहे. घोटी शहरात कृषी मालाच्या व्यापारासाठी येणारे जाणारे मुंबईकर व्यापारी सुद्धा प्रसाराला हातभार लावतात. गावोगावी कोरोना विरोधातील यंत्रणा सांभाळणारे अनेक अधिकारी कर्मचारी नाशिकहूनच रोज प्रवास करून येत असल्यामुळे ग्रामीण जनतेला ह्या काळात धोका निर्माण झालेला आहे.
कोणाच्या भरवश्यावर बसण्यापेक्षा आता नागरिकांनाच कोरोना विरोधातील लढा तीव्र करावा लागणार आहे. बेशिस्त नागरिकांना आवर घालण्यासाठी जागरूक नागरिकांनी नियोजन करायला हवे. कोणतीही लक्षणे दिसल्यास जवळच्या आरोग्य संस्थेत उपचार करण्यासाठी स्वतःहून पुढे येणे आवश्यक आहे. उपाययोजना करताना प्रशासन कुठं कमी पडत असेल तर त्यांना चांगल्या परिणामकारक सूचना देण्यासाठीही अग्रक्रमाने पुढे येणे गरजेचे आहे. आगामी काळात कोरोना रुग्ण संख्या वाढती असल्याने ती कमी करण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची अत्यावश्यकता आहे.

लेखक परिचय

लेखक दै. पुढारी नाशिकचे प्रतिनिधी असून इगतपुरीनामा वेब पोर्टलचे संपादक आहेत. हा लेख आजच्या दै. पुढारीमध्ये प्रसिद्ध झालेला आहे.
दै. पुढारी, नाशिक दि. २ एप्रिल २०२१

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!