किशोर देहाडे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
कसारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेठ्याचापाडा वस्तीतून चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या २ तरुणींचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दोघीही जिवाभावाच्या मैत्रिणींच्या एकाचवेळी मृत्यूच्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. जंगलात दोघींचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत.
अधिक माहिती अशी की, कसारा जवळ असणाऱ्या उंबरमाळी येथील पेठ्याचा पाड्यातील मनिषा धापटे या १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीस तिच्या आईने मंगळवारी सांगितले की तु शेतावर येऊ नको घरीच थांबून दुपारचे जेवण बनवून ठेव. यानंतर आई वडील शेतावर निघून गेले. मात्र मनिषा धापटे ही मैत्रीण शोभा धापटे वय १४ वर्षे हिच्या घरी जाऊन खेळत राहीली. दुपारी मनिषाची आई जेवणाचा डब्बा घेण्यासाठी घरी आली तेव्हा जेवण बनवले नसल्याचे तिच्या लक्षात आले. मनिषाला शोधून जेवण बनवले नाही म्हणून तिच्या आईने मनिषावर आरडाओरडा केला. आई मैत्रिणी समोर ओरडली या गोष्टीचा मनात राग धरून मनिषाने दुपारी घर सोडले. तिच्या पाठोपाठ तिची मैत्रीण शोभा सुद्धा घरातुन बाहेर पडली. संध्याकाळ पर्यंत दोघी घरी आल्या नाहीत म्हणून दोघींच्या घरच्यांनी त्यांची शोधाशोध केली. परंतु या दोघीही मिळुन येत नसल्याने गावातील तरुणांनी जंगलात शोध घेतला. यावेळी दोघींचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत शनिवारी मिळुन आला. ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
घटनेची माहिती मिळताच कसारा प्रभारी पोलीस निरीक्षक केशवराव नाईक, उपनिरीक्षक सलमान खतीब, कॉन्स्टेबल तिडके यांनी घटनास्थळी पोहचून मृतदेहाची पाहणी केली. हा धक्कादायक प्रकार एका पाठोपाठ समोर येताच नागरिकांसह पोलीस चक्रावले. एकाच दिवशी पेठ्याचापाडा वस्तीतील २ तरुणींचे मृतदेह आढळून आल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शहापुरचे उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. मनिषा आणि शोभा या खुप जिवाभावाच्या मैत्रीणी होत्या. दररोज एकत्रच जेवण करायच्या. एक बिस्कीट असले तरी देखील त्या अर्धे-अर्धे खायच्या असे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.