जीवनात मनमुराद आनंद मिळवण्याची गुरुकिल्ली

मार्गदर्शक : डॉ. कल्पना श्रीधर नागरे
संपर्क क्र. 9011720400
चिकित्सा आणि बाल मानसशास्त्रज्ञ
( एम. ए. बी. एड, एम. फील. सेट, पीएचडी )

लेख वाचल्यावर ज्यांना शंका विचारायच्या आहेत अथवा ज्यांना काही समस्या आणि प्रश्न आहेत अशा व्यक्तींनी व्यक्तिगत संपर्क साधल्यास त्यांना परिणामकारक मार्गदर्शन करण्यात येईल. आपल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी डॉ. कल्पना नागरे यांच्या 9011720400 ह्या क्रमांकावर अवश्य संपर्क साधावा.

मनमुराद आनंद घेण्यासाठी जीवनाकडे बघण्याचा आगळा दृष्टिकोन ह्या लेखातून वाचायला मिळेल.

“जीवन एक संघर्ष आहे
आपण लढलं पाहिजे,
जगणे ही एक कला आहे
आपण ती शिकली पाहिजे” !

मित्र मैत्रिणींनो, आपण आपल्या जीवनाकडे एक दृष्टिक्षेप टाकला तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी समस्या असल्याचे दिसते. प्रत्येकाच्या जीवनात रोजच जगण्याचा संघर्ष सुरू आहे. जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येकालाच जीवनात संघर्ष करावा लागतो. किंबहुना तो अटळच आहे. आईच्या उदरात नऊ महिने राहिलेल्या बालकाला सुद्धा या जगात प्रवेश करण्यासाठी जीवन मरण्याशी संघर्ष करूनच करावा लागतो. इतकेच नाही तर जन्माला आल्या बरोबरच त्याचा या जगाशी समायोजित होण्यासाठी संघर्ष सुरू होतो. हा संघर्ष थेट मृत्यूपर्यंत चालू राहतो.

घरातील व्यक्तीशी सुरू झालेला संघर्ष, घराबाहेर जगाशी संघर्ष, कामाच्या ठिकाणी गेल्यावर संघर्ष, थोडक्यात मनुष्य जिथे जाईल तिथे फक्त संघर्ष करीत असतो. परंतु हा संघर्ष बऱ्याचदा व्यक्तिगत न राहता सामूहिक रूप धारण करतो. जसे की, दोन कुटुंबांतील, जातीतील, दोन धर्मातील, दोन देशातील संघर्ष असे त्याचे स्वरूप प्राप्त होते. तेव्हा त्या संघर्षाची रूपरेषा बदलून जाते. अशा स्वरूपाचा कोणताही संघर्ष माणसाच्या जीवनात दुःख आणि केवळ दुःखच निर्माण करीत असतो. असुरक्षिततेची भावना बनवत असतो. त्यामुळेच व्यक्तीचे वर्तन देखील प्रभावित होत असते.

सिग्मंड फ्राईड यांनी त्यांच्या मनोविश्लेषण सिद्धांतामध्ये जीवन आणि मृत्यू उर्मीचा उल्लेख केलेला आहे. त्यांच्या मते मनुष्याचे वर्तन हे “लढा किंवा पळा” अशा स्वरूपाचे असते. एकतर व्यक्ती जीवनाशी लढा देते किंवा तिच्यापासून पलायन करते. जीवन उर्मीमध्ये व्यक्ती जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असतो. जीवन जगण्याची प्रेरणा प्राप्त करीत असतो. तर मृत्यू उर्मीमध्ये व्यक्ती जीवनाशी हार मानून स्वतःला इजा करते किंवा इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करते.
जगण्यासाठी सर्व सजीव धडपड करीत असतात. परंतु संघर्ष मात्र केवळ मनुष्य प्राणीच करतो. त्यामुळेच मानवी जीवनात कलह निर्माण होताना दिसतो. या कलहाचे सामूहिक स्तरावर या संघर्षाचे रूपांतर युद्धात होते. थोडक्यात सतत जीवनात होणाऱ्या संघर्षामुळे मनुष्याचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देखील विस्कळीत झाले आहे.

सर्व प्राणिमात्रांमध्ये केवळ मनुष्य प्राणी बुद्धिमान आहे. आपल्या बुद्धीच्या जोरावर मनुष्याने स्वतःची प्रगती देखील केली आहे. आजही दिवसेंदिवस प्रगतीच्या मार्गाने मार्गक्रमण करीत आहे. परंतु इतके करूनही केवळ मनुष्य प्राणीच कधीही समाधानी, संतुष्ट राहत नाही हे वास्तव सत्य आहे. उलट दिवसेंदिवस काहीतरी मिळवण्याची धडपड, लोभ, मोह, हाव वाढतच आहे. त्याचाच परिणाम म्हणजे निसर्गाचे संतुलन तर बिघडले आहेच. परंतु मनुष्याने स्वतःचे देखील शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडवून घेतले आहे. सध्याची कोरोनाची परिस्थिती ही त्याची परिणीती आहे असे म्हणावे लागेल !

जीवनात आलेले अपयश, प्रेमभंग, प्रिय व्यक्तीचा मृत्यु आर्थिक अडचण, अपेक्षाभंग, गंभीर आजारपण आदीमुळे व्यक्ती मानसिकरीत्या कोलमडून पडते. त्यामुळे ‘एकतर जीव घ्यावा किंवा द्यावा” हाच विचार तिच्या मनात घोळत राहतो. त्यामुळे देखील व्यक्तीचे आचार विचार विस्कळीत होतात. थोडक्यात जीवनाचा आनंद हरवून बसते. खरंतर आनंद हेच जीवनाचे उद्दिष्ट असते आणि आजच्या घडीला मनुष्य तेच हरवून बसला आहे.

कसा मिळवाल जीवनात आनंद ?

१. स्पर्धा टाळा : इतरांच्या तुलनेत आपणही कमी नाही हे दाखवण्यासाठी व्यक्तीशी सतत धडपड असते. त्यामुळे अशा व्यक्ती स्वतःचाच आनंद गमावून बसतात. म्हणून स्पर्धा टाळा. स्वतःच्या क्षमता लक्षात घेऊन उद्दीष्ठ ठरवा आणि त्यादृष्टीने प्रयत्न करा.

२. स्वीकार करा : इतरांच्या तुलनेत आपण कमी आहोत असा भाव न बाळगता, स्व:ताला कमी न लेखता आहे तसे स्वतःला स्वीकारा. एक स्वतंत्र व्यक्तीमत्व म्हणून स्वतःकडे बघा.

४. समाधानी वृत्ती : बऱ्याच व्यक्ती आपल्याकडे काय नाही याचा बागुलबुवा करतात. असे न करता जे आहे त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. “काय नाही यापेक्षा काय आहे” याकडे विशेषत: लक्ष द्या.

६. आत्मपरीक्षण करा : आपण कोण आहोत ? आपला स्वभाव नेमका कसा आहे ? आपल्यात कोणते कलागुण आहे ? आपले गुण दोष कोणते आहेत ? याचे स्वतः आत्मपरीक्षण करा. जेणेकरून तुम्हाला तुमचे जीवनाचे उद्दिष्ट ठरवता येईल.

७. सकारात्मक दृष्टिकोन : जीवनाकडे आणि जीवनात आलेल्या समस्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघा. अपयश आल्याने खचून न जाता “अपयश यशाची पायरी आहे” असे समजून पुन्हा एकदा त्यासाठी प्रयत्न करा.

८. व्यायाम : रोज किमान एक तास तरी योगा, ध्यान आणि व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे दिवसभर तुमचे मन आणि शरीर दोन्ही प्रसन्न आणि ताजेतवाने राहील.

९. छंद जोपासा : प्रत्येक व्यक्तीला कुठला ना कुठला छंद असतोच। ठराविक वेळेत आपले छंद जोपासा. त्यातून निश्चितच आनंद मिळेल.

१०. पुस्तके वाचा : चांगली पुस्तके नेहमीच व्यक्तीला तणावमुक्त आणि प्रसन्न करीत असतात. रोज किमान काही वेळ चांगल्या पुस्तकांचे वाचन करा. त्यातून नक्कीच चांगले विचार आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल.

११. मित्र : चांगल्या मित्रांच्या संपर्कात राहा. गप्पागोष्टी करा, त्यांच्यासोबत सहलीचे आयोजन करा, आठवड्यातून एकदा तरी किमान भेठीगाठी घ्या. त्यामुळे निश्चितच ताजेतवाने आणि प्रसन्न वाटेल.

१२. हसा आणि हसवा : हसणे आणि हसवणे ही कला आहे. ते आत्मसात करा. स्वतःच्या विनोद बुद्धीचा विकास करा. प्रत्येक गोष्टीकडे गांभीर्याने न बघता तिची सकारात्मक बाजू लक्षात घेऊन तिचा आनंदाने स्वीकार करा. हसण्यामुळे शरीर आणि मन दोन्हीही तणावमुक्त तर होते शिवाय शरीरात रक्त प्रवाह देखील सुरळीत राहतो.

‘मरण सोपं असतं परंतु जगणं कठीण’ हे जरी सत्य असले तरी जीवन हे एकदाच मिळते. त्यात खूप काही करण्यासारखे आहे. फक्त त्याचा शोध घेता आला पाहिजे. “समस्या नाही अशी व्यक्ती नाही आणि समस्येला उत्तर नाही अशी कोणतीही समस्या नाही” हे लक्षात घ्या. सतत एकाच गोष्टीमुळे अपयश येत असेल तर पराभवाने खचून न जाता दुसरा मार्ग निवडा. कदाचित यश तुमची वाट बघत असेल. प्रेम ही एक उदात्त भावना आहे, ती केवळ एक व्यक्ती, समाज एवढ्यावर मर्यादित असू शकत नाही. प्रिय व्यक्तीचे सोडून जाणे निश्चित दुःखद आहे. परंतु केवळ सतत तिचाच विचार न करता ज्यांना तुमची गरज आहे अशा व्यक्तींचा विचार करा.

जीवन हे एका चित्राप्रमाणे असले पाहिजे. ज्यामध्ये सुख, दुःख, आनंद, आश्चर्य, भीती, राग, लोभ अशा विविध भावनांचे रंग भरले पाहिजे. आपणच आपल्याच जीवनाकडे तटस्थपणे बघितले पाहिजे. ज्याला हे कळलं तो खऱ्या अर्थाने जीवन जगलाअसं म्हणावं लागेल शेवटी इतकंच सांगावसं वाटतं की….

“हे जीवन सुंदर आहे” !!

( लेखिका डॉ. कल्पना श्रीधर नागरे ह्या चिकित्सा आणि बाल मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांची सेट नेट मानसशास्त्र, मनोविकृती मानसशास्त्र, उपयोजित मानसशास्त्र, वैकासिक मानसशास्त्र आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत. )

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!